‘तो’ पाणी वितरणासाठी फिरतो वणवण
By Admin | Updated: May 20, 2017 00:57 IST2017-05-20T00:57:59+5:302017-05-20T00:57:59+5:30
निवडणुकीत अनेक आश्वासने लोकांना दिली जातात. मात्र ती प्रत्यक्षात उतरणार की नाही हे निवडणूक निकालानंतर अवलंबून असते.

‘तो’ पाणी वितरणासाठी फिरतो वणवण
पराभवानंतरही आश्वासनाची पूृर्ती : साकोलीत मोफत पाण्याचा पुरवठा
शिवशंकर बावनकुळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : निवडणुकीत अनेक आश्वासने लोकांना दिली जातात. मात्र ती प्रत्यक्षात उतरणार की नाही हे निवडणूक निकालानंतर अवलंबून असते. पराभव झाला तर अशा आश्वासनांचा विसरच पडल्याचे आजपर्यंत आपण अनुभवले आहे. मात्र साकोलीच्या प्रभाग क्रमांक एक मधून पराभूत झालेले झनकलाल लांजेवार यांनी आपले वेगळेपण कायम ठेवले आहे.
निवडणुकीत पराभव झाले असले तरी लोकांच्या समस्याप्रती तळमळ असल्याने त्यांनी स्व:खर्चाने टँकर लावून वॉर्ड क्रमांक एक मधील लोकांना पाणी पुरविण्याचे काम सुरू केले आहे. मुळात सामाजिक कार्याची आवड असलेल्यांना राजकारणातील जय, पराजय काम करण्यापासून थांबवू शकत नाही हेच झनकलाल यांच्या निमित्ताने स्पष्ट होते. नगर परिषद, निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून भाजपचे उमेदवार असलेले झनकलाल यांचा पराभव झाला. मात्र पराभवाचे खापर मतदारावर न फोडता त्यांनी सर्वसामान्यांशी आपली नाळ न तोडता उलट निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांच्या पुर्तीच्या दृष्टीने त्यांनी पाऊल टाकले. प्रभाग क्रमांक १ मध्ये असलेली पाणी समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. बोलल्याप्रमाणे त्यांनी स्व:खर्चाने प्रभागात मोफत पाणी पुरवठा करण्याचा सपाटा लावला आहे. एकीकडे प्रशासन लोकांची गरज पूर्ण करण्यात असमर्थ ठरत असताना झनकलाल यांनी मात्र आपले कर्तव्य पार पाडण्यात सुरूवात केली आहे. दिवसभरातून सहा ते सात वेळा वॉर्डात फिरून लोकांना पाणी पुरवितो. पराभवरानंतरही समाजसेवेत खंड न पडू देणारा पराभव असला तरी नक्कीच तो नगरसेवक आहे.