दोन कुटुंबांचे संबंध वृद्धिंगत करते ‘हारगाठी’
By Admin | Updated: March 4, 2015 00:58 IST2015-03-04T00:58:18+5:302015-03-04T00:58:18+5:30
विवाहयोग्य मुला-मुलींचे जर होळी सणापूर्वी साक्षगंध झाले तर मुलीला हार-गाठी

दोन कुटुंबांचे संबंध वृद्धिंगत करते ‘हारगाठी’
आली होळी : साक्षगंधानंतरची परंपरा आजही कायम
पवनी : विवाहयोग्य मुला-मुलींचे जर होळी सणापूर्वी साक्षगंध झाले तर मुलीला हार-गाठी नेण्याची परंपरा झाडीपट्टीतील अनेक गावात आजही सुरु आहे. ही हार-गाठी दोन्ही कुटुंबांचे संबंध वृद्धिंगत व्हायला मदत करते.
दिवाळीनंतर हातात पिक आल्यानंतर शेतकरी चिंतामुक्त होतो व विवाहयोग्य मुलामुलींकरिता स्थळ शोधणे सुरु करतो. ही सुरुवात तुळशी विवाहानंतर केली जाते. ज्या मुलामुलींचे होळी सणाअगोदर विवाह संबंध जुळतात त्या कुटुंबात एक आपुलकीचे नातेसंबंध जोडले जातात. होळीच्या अगोदर साक्षगंध झालेल्या मुलींकरिता मुलाकडील मानवाईक प्रतिष्ठीत व्यक्त हार गाठी नेतात.
ही हारगाठी नारळातील खोबऱ्याच्या डोलांपासून व खारकांपासून तयार केलेली असते. ही हारगाठी विशिष्ट दुकानातील अनुभवी लोकच तयार करतात. या हारगाठीची किंमत ही त्यातील खोबरा डोलाच्या व खारकांच्या संख्येवर आधारित असते. अधिक संख्या असली तर अधिक किंमत असते. महाशिवरात्रीची अमावस्या झाल्यानंतर उजेडात होळीपर्यंत ही हारगाठी मुलींना नेली जाते. कोणी या हारगाठीसोबत साडी कपडे ही नेतात.
हारगाठी घेवून येणाऱ्या मुलाकडील लोकांचे मुलीच्या घरी आदर आतिथ्य, पाहुणचार केलेजाते. कोणत्या वेळेस मुलीकडील मंडळीही मुलांकरिता हारगाठी घेवून जातात. शेकडो वर्ष झाले पण झाडीपट्टीतील अनेक गावातील बहुतेक समाजात ही हारगाठी नेण्याची परंपरा आजही सुरु आहे. या हारगाठींमुळे दोन्ही कुटुंबाचे संबंध वृद्धींगत होण्यास मदत होते. या हारगाठीमधील खोबरे खारका खाण्याकरिता बच्चे कंपनी हारगाठी आणण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. या वर्षी पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात हारगाठ्या नेल्या जाणार आहेत. (शहर प्रतिनिधी)