चरणदास बावणे कोंढा कोसरा सेंद्री (खुर्द) येथील शेतकरी भानुदास गायधने यांनी अर्धा एकर शेतीतून ८० हजार रुपयाचे चवळी शेंग, कारले व भेंडीचे पीक खरीप हंगामात घेतले. त्यासाठी ३० हजार रुपये बी बियाणे, मशागत, औषधी खर्च आला. ५० हजार रुपये शुद्ध नफा झाला. अजूनही चवळी शेंग निघत आहे. त्यामुळे अर्धा एकर शेतीच्ने आपल्या कुटुंबाला आधार दिला असे सांगितले.कोंढा ते बेलाटी मार्गावर डाव्या कालव्याजवळ भानुदास गायधने यांचे दीड एकर शेत आहे. सिंचनाची सोय असल्याने मागील तीन वर्षापासून अर्धा एकर शेतीत भाजीपाल्याचे पीक घेतले जात आहे. त्यामुळे कुटुंबाला मोठा आधार झाला आहे. कुटुंब चालविण्यास अर्धा एकर शेत मदत करीत आहे. भानुदास गायधने हे सेंद्री (खुर्द) येथील प्रतिष्ठीत शेतकरी तसेच त्यांचेकडे एकूण १०.५ एकर शेती आहे. दोन गट दोन ठिकाणी ५ व ४ एकर शेती आहे. तर डाव्या कालव्याजवळ दीड एकर शेती आहे. पण ते दीड एकर शेतीकडे लक्ष देतात. त्याच शेतीतील अर्धा एकर शेतीने त्यांना जगण्याचा आधार दिला आहे. दुसरीकडच्या ९ एकर शेतीत १०० पोते धान झाले. त्याचे १ लाख ३० हजार रुपये मिळाले. पण ९ एकर शेतीसाठी बी बियाणे, खत, औषधी, मशागत, मळणी एकूण १ लाख ३५ हजार रुपये खर्च झाला. त्यामुळे धानाची शेती परवडणारी नाही. सतत तीन वर्षापासून धान शेतीत तोटा सहन करीत आहे. असे लोकमतशी बोलताना सांगितले. अर्धा एकर शेती माझी अन्नदाता आहे. तिनेच मला मोठा आधार तीन वर्षापासून दिला आहे. धान पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय असल्यास धानाच्या मागे न जाता भाजीपाला पिक खरीप हंगामात घ्यावे असे त्यांनी आवाहन केले आहे. त्यांनी देखील धानाची शेती केली आहे. सतत तीन वर्षापासून सिंचन सुविधा असून देखील शेती तोट्यात आहे. अर्धा एकर शेतीमध्ये कारले, चवळी शेंग, भेंडी यांचे उत्पादन घेत आहे.
अर्धा एकर शेतीत ८० हजारांचे उत्पन्न
By admin | Updated: January 7, 2016 00:54 IST