लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील मणप्पुरम गोल्ड लोन बँकेच्या व्यवस्थापकाकडून १७.७६ लाख रुपयांनी फसवणूक झालेल्या अमित जोशी नामक ग्राहकाने गुरुवारी दुपारी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर विष घेतले. सध्या अमित जोशीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. असे कृत्य करण्यासाठी एका व्यक्तीने प्रवृत्त केल्याचे बयाण त्याने पोलिसात दिले आहे. वृत्त हाती येईपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
माहितीनुसार, हिमांशू अमित जोशी यांच्या नावाचे भंडारा येथील गांधी चौकस्थित मणप्पुरम गोल्ड लोन बँकेत खाते आहे. वडिलांच्या आजारपणामुळे पैशांची गरज असल्यामुळे त्यांनी या बँकेमध्ये १९ जुलै रोजी २९२ ग्रॅम सोने गहाण ठेवले होते. मात्र सध्या पैशाची गरज नसल्याने ती रक्कम गोल्ड लोन खात्यात वळती करण्याच्या प्रक्रियेत बँक व्यवस्थापक रोहित साहू याने आपल्या पत्नीच्या खात्यावर अनुक्रमे १६ लाख ८१ हजार ८०० व ९५ हजार रुपये, असे एकूण १७ लाख ७६ हजार ८०० रुपयांची रक्कम वळती केली. दरम्यान बँकेचा व्यवस्थापक रोहित दयाराम साहू फरार झाला. बँकेकडून सहकार्य मिळत नसल्याने त्यांनी पोलिसात तक्रार केली होती.
अमित जोशीच्या बयाणामुळे खळबळदरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन अमित जोशी यांनी पोलिस अधीक्षकांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते तुमसरला गेले असल्याने भेट होऊ शकली नाही. यादरम्यान, त्यांनी सोबत आणलेले वीष प्राशन केले. आपणास हे कृत्य करण्यासाठी एका व्यक्तीने प्रोत्साहित केले, असे केल्यास रक्कम तातडीने परत मिळेल, असे सांगण्यात आले होते, असेही बयानात म्हटल्याची माहिती आहे.