शाळेत शिरून विद्यार्थ्याला मारहाण
By Admin | Updated: February 10, 2016 00:32 IST2016-02-10T00:32:39+5:302016-02-10T00:32:39+5:30
शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या क्षुल्लक भांडणामुळे राग अनावर झालेल्या एका इसमाने शाळेत शिरून चक्क विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

शाळेत शिरून विद्यार्थ्याला मारहाण
विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर : पाहुणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
विरली (बु.) : शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या क्षुल्लक भांडणामुळे राग अनावर झालेल्या एका इसमाने शाळेत शिरून चक्क विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना लाखांदूर तालुक्यातील पाहुणगाव येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत आज मंगळवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या विद्यार्थ्यांचा वाली कोण, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
या घटनेतील पीडित विद्यार्थ्याचे नाव निखील रामदास राऊत असे असून तो चौथ्या वर्गाचा विद्यार्थी आहे. वर्गात बसले असताना त्याला निशा वाघमारे या विद्यार्थिनीने पेन्सील टोचली. त्यामुळे निखीलने निशाला मारले. निशाने शाळेतून घरी जावून आपल्या वडिलांना निखिलने मारल्याची तक्रार केली.
वडील मंगेश वाघमारे यांचा राग अनावर झाला. त्यांनी तातडीने शाळा गाठून वर्गात बसलेल्या निखीलला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याची चाहूल समोर वर्गात अध्यापन करीत असलेल्या सहायक शिक्षक आर.एस. कापसे यांना लागली. त्यांनी आपल्या परीने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत त्यांचे इतर सहकारी शिक्षक धावले. त्यामुळे मंगेशने अखेर शाळेतून पळ काढला.
घटनेची माहिती गावात पसरताच सरपंच देवीदास राऊत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष कोरे, पोलीस पाटील छत्रपती नाकतोडे आणि गावकरी मोठ्या संख्येने शाळेत गोळा झाले. या घटनेमुळे येथील शिक्षकांविषयी गावकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
या शाळेत १ ते ७ वर्ग असून ६ शिक्षक कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी मुख्याध्यापक एस.एस. इखार आणि शिक्षक पी.एल. घरत हे शाळाभेटीसाठी कढाली (जि.चंद्रपूर) येथे गेले होते. सहायक शिक्षिका एन.आर. ब्राम्हणकर या रजेवर होत्या. त्यामुळे केवळ तीन शिक्षकांवर ७ वर्ग सांभाळण्याची वेळ आली. घटनेच्या वेळी चौथ्या वर्गावर शिक्षक उपस्थित नव्हते.
त्यामुळे सदर इसमाने संधी साधून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचे दिसून येते. या शाळेतील शिक्षक शाळेत वेळेवर हजर राहत नाहीत. त्यामुळे बरेचदा येथील विद्यार्थी वाऱ्यावर असतात, असा संतप्त गावकऱ्यांचा आरोप आहे. शाळा सुरु असताना वाघमारे याने त्या विद्यार्थ्याला मारहाण केली कशी?, त्यावेळी शिक्षक काय करीत होते, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)
घटनेच्या वेळी आम्ही केवळ तीन शिक्षक शाळेत उपस्थित होतो. त्यामुळे आम्हाला सात वर्ग सांभाळताना या वर्गात थोडा वेळ, दुसऱ्या वर्गात थोड ावेळ देणे भाग होते. चौथ्या वर्गात शिक्षकांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा वाघमारे यांनी घेतला. यात आम्हा शिक्षकांचा काहीच दोष नाही.
-आर.एस. कापसे
सहायक शिक्षक,
जि.प. प्राथ. शाळा, पाहुणगाव