'मला एक रुपया द्या', गावासाठी उपसरपंच मागतोय भीक; हाती का घेतला भीकेचा 'कटोरा'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 18:55 IST2025-08-29T18:53:53+5:302025-08-29T18:55:12+5:30
Bhandara : तहानलेल्या गावाच्या मदतीसाठी उपसरपंचाचा अनोखा एल्गार ! परसवाडा उपसरपंचांचा भीक आंदोलनातून शासनावर घणाघात

'Give me one rupee', the village sub-sarpanch is begging for alms; Why did he take up the 'bowl' of alms?
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील परसवाडा (देव्हाडी) येथील दीर्घकाळापासून ठप्प झालेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपसरपंच पवन खवास यांनी थेट आणि अनोखे आंदोलन छेडले. तहसील कार्यालयात 'भिकेचा कटोरा' हातात धरून 'मला एक रुपया द्या', अशी मागणी करीत त्यांनी या प्रशासनाला धारेवर धरले. आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे तहसील कार्यालयासह उपविभागीय कार्यालयात काही काळ खळबळ उडाली. या भीक मांगो आंदोलनाची सोशल मीडियावर चित्रफीत व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली असून, शासन दरबारी गंभीर दखल घेतली गेल्याची माहिती पुढे आली आहे.
गावातील पाणीपुरवठा योजना तब्बल २० वर्षापासून ठप्प आहे. २०१८-१९ मध्ये तत्कालीन पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांना पत्रव्यवहार करून मागणी केली होती. त्यानंतर परसवाडा, हसारा, खापा, ढोरवाडा व स्टेशन टोली ही गावे जलजीवन मिशनमध्ये समाविष्ट झाली. मात्र, नळयोजना घराघरापर्यंत पोहोचली असली तरी नळात आजवर पाण्याचा एकही थेंब आला नाही. निधीअभावी योजना बंद केल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे.
या आंदोलनातून प्रत्येक शासकीय विभागाकडून व एक-एक रुपया भीक मागून जमा झालेली रक्कम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देत आहे, असे सांगून उपसरपंच पवन खवास यांनी शासनाच्या अपुऱ्या नियोजनावर उपरोधिक टीका केली.
अधिकाऱ्यांनी ऐकले; आश्वासन दिले
तुमसर येथील उपविभागीय अधिकारी कश्मिरा संख्ये व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी यांनी खवास यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व यासंदर्भात लेखी निवेदन द्या. आम्ही शासनाकडे पाठवून पुढील कार्यवाही करू, असे आश्वासन दिले. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची तुमसर तालुक्यात खमंग चर्चा सुरू आहे.
लाडक्या बहिणींची पाण्यासाठी पायपीट
गावासाठी अनेक आंदोलने केली, अखेर नळयोजना आणली; पण शासन निधी नसल्याचे कारण देऊन भरपावसातच योजना बंद करते. एकीकडे शासन 'लाडकी बहीण' म्हणते; पण खरी बहीण तहानलेली आहे. तिची तहान कधी भागणार? अशा ज्वलंत शब्दांत खवास यांनी शासनाच्या दुटप्पी भूमिकेवर घणाघात केला.