स्वच्छता अभियानापासून सर्वसामान्य अद्याप दूरच !
By Admin | Updated: February 23, 2015 01:03 IST2015-02-23T01:03:57+5:302015-02-23T01:03:57+5:30
महाराष्ट्राला संत गाडगेबाबा हे थोर व्यक्तिमत्त्व लाभले. त्यांनी राबविलेली स्वच्छता अभियान आता देशभरात राबविण्यात येत आहे....

स्वच्छता अभियानापासून सर्वसामान्य अद्याप दूरच !
प्रशांत देसाई भंडारा
महाराष्ट्राला संत गाडगेबाबा हे थोर व्यक्तिमत्त्व लाभले. त्यांनी राबविलेली स्वच्छता अभियान आता देशभरात राबविण्यात येत आहे. मात्र, स्वच्छता अभियानात ग्रामीण भागापेक्षा शहरी भाग मागासलेला आहे. केवळ १६ टक्केच शहरवासीयांनी या अभियानात सहभाग घेतला असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या तुलनेत शालेय विद्यार्थ्यांनी यात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून परिसर स्वच्छतेवर भर दिला. या आकडेवारीवरून सर्वसामान्य अद्याप अभियानापासून दूरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गाडगेबाबांनी ज्यावेळी हे कार्य केले त्यावेळी लोकांनी त्यांना हशात काढले. मात्र, त्यांनी स्वच्छतेचा ध्यास सोडला नाही. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यात तत्कालीन ग्रामीण विकास मंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी त्यांच्या नावाने 'संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान' सुरू केली. यासोबतच निर्मल ग्राम योजनाही शासनाने अंंमलात आणली आहे. अनेक गावे यातून स्वच्छ झालीत, पुरस्कार मिळाला मात्र त्यानंतर काय? पुढे पाठ मागे सपाट अशीच परिस्थिती सर्वत्र दिसून येत आहे.
अमरावती जिल्ह्यातील एका धोबी कुटूंबात गाडगेबाबांचा जन्म १८७६ मध्ये झाला. त्यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा संदेश देऊन चळवळ राबविली. १९५७ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर ही चळवळ थंडावली. मात्र, त्यांनर आर. आर. पाटील यांच्या रूपात असलेले ग्रामीण विकास मंत्री यांनी गाडगेबाबांच्या नावाने अभियानाला जीवंत रूप देण्याचा विळा उचलला. गाडगेबाबांची 'ती' चळवळ आता देशभरात प्रेरणादायी ठरून एका शिखरावर पोहचली आहे.
'स्वच्छ भारत' अभियानांतर्गत येणाऱ्या पाच वर्षामध्ये संपूर्ण देश स्वच्छ करण्याचा निर्धार शासनाने केला आहे. हे अभियान सुरू होऊन सुमारे पाच महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र, शहरातील नागरिक या अभियानापासून अद्यापही कोसोदूर असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनातर्फे विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविल्यानंतरही शहरातील तब्बल ८४ टक्के लोकांनी अद्यापही या अभियानात सहभाग घेतलेला नाही. अभियानाच्या जनजागृतीसाठी शासनाने विविध उपक्रम राबविले. प्रत्येकाकडून कचरा निर्माण होत असतो. मात्र, निर्माण झालेला कचरा दुसरा कोणीतरी उचलावा, अशी मानसिकता नागरिकांची असते. यामध्ये बदल होत असला तरी, आपल्या परिसरातील कचरा आपणच उचलावा, आणि आपणच आपले आरोग्य राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, ही मानसिकता रूजविण्याची आवश्यकता आहे.
कचरा विलगीकरणाकडे कानाडोळा
सुक्या कचऱ्यामध्ये काच, चामड्यांच्या वस्तू, कागद, प्लास्टिक, थर्माकोल, लाकूड सामानासह अन्य वस्तू येतात. तर फळे, खाद्यपदार्थ, भाजीपाला, अंडी तसेच टाकाऊ पदार्थ या बाबीला ओला कचरा असे म्हटले जाते. घरात निर्माण झालेला कचरा घंटागाडीमध्ये टाकण्यापूर्वी या कचऱ्याचे ओला आणि सुका असे विलगीकरण करण्याची आवश्यकता असते. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
२ आॅक्टोबर २०१४ पासून देशभरात सुरू झालेले स्वच्छ भारत अभियान २ आॅक्टोबर २०१९ रोजी संपणार आहे. या पाच वर्षात या योजनेसाठी १ लाख ९६ हजार ९ कोटी रूपये खर्चाचे नियोजन आहे. ग्रामीण आणि शहरी भागात सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढविणे, प्रत्येक घरामध्ये शौचालय उभारणे, याबरोबरच स्वच्छ पाणी पुरवठा करणे तसेच विविध वस्त्यांबरोबरच रस्ते, फुटपाथ आदी स्वच्छ ठेवण्यारचा यात समावेश आहे.