सहा महिन्यात १८ घाटातून चार कोटींच्या रेतीची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST2020-03-15T06:00:00+5:302020-03-15T06:00:22+5:30
तुमसर व मोहाडी या तालुक्यातून वैनगंगा नदी ५० ते ६० किलोमीटर प्रवास करते. तर बावनथडी नदी सुमारे २५ ते ३० किलोमीटर आहे. दोन्ही तालुक्यात १८ अधिकृत रेतीघाट आहेत. महसूल प्रशासन दरवर्षी घाटांचा लिलाव करते. परंतु गत सहा महिन्यांपासून लिलाव झालाच नाही. त्यामुळे या काळात रेतीघाटातून राजरोसपणे रेतीची लूट करण्यात आली.

सहा महिन्यात १८ घाटातून चार कोटींच्या रेतीची लूट
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वैनगंगा आणि बावनथडी नदीवरील तुमसर-मोहाडी तालुक्यातील १८ रेतीघाटावरून सहा महिन्यात चार कोटींच्या रेतीची लूट करण्यात आली. गत सहा महिन्यांपासून रेतीघाट लिलावाशिवाय असल्याने घाट रेतीतस्करांसाठी मोकळे आहेत. महसूल आणि पोलीस प्रशासनाला हाताशी धरून रेती तस्करांनी या दोन तालुक्यात धुमाकुळ घातला आहे.
तुमसर व मोहाडी या तालुक्यातून वैनगंगा नदी ५० ते ६० किलोमीटर प्रवास करते. तर बावनथडी नदी सुमारे २५ ते ३० किलोमीटर आहे. दोन्ही तालुक्यात १८ अधिकृत रेतीघाट आहेत. महसूल प्रशासन दरवर्षी घाटांचा लिलाव करते. परंतु गत सहा महिन्यांपासून लिलाव झालाच नाही. त्यामुळे या काळात रेतीघाटातून राजरोसपणे रेतीची लूट करण्यात आली. दरदिवशी ३०० ते ४०० ट्रक-ट्रॅक्टरमधून रेतीचा बेशुमार उपसा सुरु आहे. नियमबाह्य वाहतूक दोन्ही तालुक्यातून होत असून एका रेतीच्या ट्रकची किंमत १५ ते १६ हजार रुपये आहे. सरासरी महिन्याला एक कोटी ६० लाखांच्या रेतीची लूट येथे करण्यात आली. सहा महिन्यात हा आकडा पाच ते सहा कोटी इतका होतो. या रेतीच्या तस्करीमुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे.
रेती लुटीत तस्करांनी आधुनिक साधनांचा वापर सुरु केला आहे. जेसीबी, पोकलँड मशीनच्या सहाय्याने रेतीचा उपसा करून त्याची ट्रक - ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जाते. तुमसर आणि मोहाडी तालुक्यात जेसीबी आणि पोकलँड मशीनधारकांची संख्या अलिकडे वाढल्याचे दिसते. तस्करीवर कुणाचा अंकुश नाही.
केवळ स्थानिक स्तरावर रेती तस्करांनी प्रशासनाला हाती धरले नाही तर थेट नागपूरपर्यंत साखळी निर्माण केली आहे. तुमसर-मोहाडीतून निघालेला ट्रक सुखरुप पोहचविण्यासाठी हा सर्व प्रकार केला जातो. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरून हा गोरखधंदा सुरु आहे. रेतीतस्करीचे मुख्य केंद्र नागपूर असल्याचे सांगितले जाते.