ढिवर समाजबांधवांना मिळणार रोजगाराचा आधार
By Admin | Updated: March 8, 2016 00:31 IST2016-03-08T00:31:12+5:302016-03-08T00:31:12+5:30
मत्स्यपालन व्यवसायातून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या ढिवर समाज बांधवांना पंचायत समिती स्तरावर रोजगाराला आधार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ढिवर समाजबांधवांना मिळणार रोजगाराचा आधार
जाळ वाटपाचे नियोजन : तुमसर पंचायत समितीस्तरावर प्रयत्न
तुमसर / चुल्हाड (सिहोरा) : मत्स्यपालन व्यवसायातून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या ढिवर समाज बांधवांना पंचायत समिती स्तरावर रोजगाराला आधार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समाज बांधवांना जाळ वाटप केले जाणार असल्याची माहिती सभापती कविता बनकर यांनी दिली आहे.
तलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात ढिवर समाज बांधव उपेक्षित आहेत. उदरनिर्वाहाचे साधने नसल्याने रोजगाराचा अभाव असल्याने या समाजाचा उदरनिर्वाह मत्स्यपालन व्यवसायावर अवलंबून आहे. या शिवाय मत्स्यपालन व मत्स्य पकडणे हा त्यांचा वडिलोपार्जीत व्यवसाय असल्याने आजही या परंपरेची जोपासना करीत आहे. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुमसर पंचायत समिती अंतर्गत प्रथमत:च आधार देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या समाजातील बांधवांना जाळ वाटप केले जाणार आहे. जाळ खरेदीकरिता चार लाख रुपयांच्या नियोजनाला मंजुरी देण्यात आली आहे. शेष फंड अंतर्गत शेतकरी व अन्य समाजबांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे उत्पादित साहित्याचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी ताडपत्री खरेदीला आठ लाख रुपयांच्या खर्चाला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील गरीब कुटुंबीयांना सौर ऊर्जेवरील दिवे खरेदीसाठी आठ लाख रूपयांचे नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील गरीबांच्या घरात यामुळे प्रकाश झळकणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना सायकल खरेदी व वाटपासाठी सहा लाख रुपयाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली असून पाणी पुरवठा योजनेवर १३ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. नाली व शेड बांधकाम विकासाकरिता १७ लाख रुपयाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. विविध प्रवर्ग, शेतकरी व शाळाकरी विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी पंचायत समिती स्तरावर येत्या वर्षात खर्चााल अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. उमरवाडा गाव दत्तक घेतल्याची माहिती सभापती कविता बनकर यांनी लोकमतला दिली आहे. (तालुका प्रतिनिधी/ वार्ताहर)