मासेमाराचा विद्युत करंटने मृत्यू
By Admin | Updated: February 13, 2016 00:19 IST2016-02-13T00:19:55+5:302016-02-13T00:19:55+5:30
गोसेखुर्द धरणात नावेतून मासेमारी करताना जलाशयावरून गेलेल्या विजेच्या ताराचा स्पर्श झाल्याने एका मासेमाराचा जागीच मृत्यू झाला.

मासेमाराचा विद्युत करंटने मृत्यू
पवनी : गोसेखुर्द धरणात नावेतून मासेमारी करताना जलाशयावरून गेलेल्या विजेच्या ताराचा स्पर्श झाल्याने एका मासेमाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
होरालाल नान्हे (३४) रा. पवनी असे मृतकाचे नाव आहे. होरालाल व भोलाराम भानारकर (३०) हे दोघे आज सकाळी गोसीखुर्द धरणाच्या बुडीत क्षेत्रातील थुटानबोरी गावाजवळ मासेमारी करीत होते. दरम्यान जलाशयातून गेलेल्या विजेच्या तारांना होरालालचा स्पर्श झाल्याने तो २५ फुट खोल पाण्यात फेकला गेला. त्यानंतर पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. याची माहिती भोलारामने नान्हे यांच्या घरी व पवनी पोलीस ठाण्यात दिली.
घटनास्थळ भिवापूर ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे पवनीचे ठाणेदार मधुकर गीते यांनी भिवापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पवनी व भिवापूर पोलिसांनी मासेमार बांधवाच्या मदतीने शोधकार्य सुरु केले. शोधकार्यात विद्युत तारांचा अडथळा येऊ नये, यासाठी वीज प्रवाह बंद करण्यात आला होता.
थुटानबोरी हे गाव धरणाच्या बुडीत क्षेत्रात असून या गावाला पुनर्वसनाकरिता मोबदला मिळाला असून पुनर्वसन ठिकाणी भूखंड मिळूनही गावकऱ्यांनी गाव रिकामे केलेले नाही. (शहर प्रतिनिधी)