बचतगटांच्या महिलांची आर्थिक पिळवणूक
By Admin | Updated: January 17, 2016 00:33 IST2016-01-17T00:33:03+5:302016-01-17T00:33:03+5:30
बँकेतून कर्ज घेऊन व्यवसाय उभारणीसाठी मदत करणाऱ्या महिला आर्थिक विकास मंडळाने बचत गटाच्या महिलांची आर्थिक पिळवणूक केली आहे.

बचतगटांच्या महिलांची आर्थिक पिळवणूक
माविमचा प्रकार : महिलांनी केली जिल्हाधिकारीकडे तक्रार
भंडारा : बँकेतून कर्ज घेऊन व्यवसाय उभारणीसाठी मदत करणाऱ्या महिला आर्थिक विकास मंडळाने बचत गटाच्या महिलांची आर्थिक पिळवणूक केली आहे. याबाबत उपहारगृह चालविणाऱ्या महिलांनी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना निवेदनातून तक्रार केली आहे.
महिला व पुरुषांना समाजात आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थसहाय व मार्गदर्शन करते. भंडारा येथील काही महिलांनी एकत्र येवून जेसीजी ग्रृप तयार केला. त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्हा परिषद भंडारा येथे उपहारगृह चालविण्याचा बेत आखला. यासाठी माविमला पिंडकेपार येथील महिला बचत गटाने ५० हजार रुपये, प्रशिक महिला बचत गट निमगावने ३ लाख रुपये, सर्व महिलांनी मिळून ९० हजार रुपये व अन्य प्रकारचे ६० हजार रुपये तथा या महिलांनी बँक आॅफ इंडियाकडून घेतलेले २ लाख ५० हजार रुपये माविमच्या ज्योती निंबोळकर यांच्या सुपूर्द केले.
१५ आॅगस्ट २०१४ पासून या नऊ महिला उपहारगृह चालवित आहेत. दरम्यान त्यांना विविध आर्थिक प्रलोभने देवून निंबोळकर यांनी त्यांची आर्थिक पिळवणू केल्याचा आरोप या महिलानी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतुन केला आहे. उपहारहगृहाच्या शुभारंभापूर्वी निंबोळकर यांनी या महिलांना विश्वासात न घेता स्वत:च्या मर्जीतील कंत्राटदाराकडून उपहारगृहाचे साहित्य खरेदी केले व त्याचा हिशोबही महिलांना दिलेला नाही.
सदर नऊही महिलांनी अन्नपुर्णा नावाने जिल्हा परिषदमध्ये उपहारगृह सुरु करुन त्यांना प्रति महिला तीन हजार रुपये देण्याचे प्रलोभन निंबोळकर यांनी दिले होते. मात्र सुरुवातीपासून आजतागायत त्यांना याची रक्कम दिली नसल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. दरम्यान निंबोळकर यांनी या महिलांना डावलून दुसऱ्या बचत गटाच्या महिलांना उपहारगृह चालविण्यासाठी दिले आहे. यामुळे आर्थिक विंवचनेत सापडलेल्या या महिलांवर बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड थकीत झाली आहे. यामुळे बचतगटांच्या महिलांची फसवणुक करणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक ज्योती निंबोळकर यांच्यावर कारवाई करुन बचत गटाच्या महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे सहकार्य करावे अशी मागणी या निवेदनातून केली आहे. निवेदनकर्त्या महिलांमध्ये जयनंदा हुमणे, जया मेहर यांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)
उपहारगृह चालविणाऱ्या महिलांचा आर्थिक व्यवहारातून वाद उफाळला आहे. आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आल्याने बचतगटाच्या अन्य महिलांनी या दोन महिलांना त्यांच्या गटातून बाहेर काढले आहे. या महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळाने आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहे. मात्र माविमचा यात कुठलाही हस्तक्षेप नसतानाही महिलांकडून जाणीवपूर्वक बदनामी करण्यात येत आहे.
- ज्योती निंबोळकर, जिल्हा समन्वयक, माविम भंडारा