अखेर बावनथडी नदीपात्रात रेतीसाठी सीमांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 23:40 IST2021-03-06T05:00:00+5:302021-03-05T23:40:02+5:30
बावनथडी नदी राज्याचे शेवटचे टोक आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमा नदीने निश्चित केल्या आहेत. मध्यप्रदेश शासनाने बालाघाट जिल्ह्यातील सर्वच नदी घाटांचे लिलाव केले परंतु तुमसर तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव झाले नाही. तुमसर तालुक्यातील वारपिंडकेपार गावाजवळून बावनथडी नदी वाहते. नकाशावरून महाराष्ट्राच्या हद्दीत तालुका महसूल प्रशासनाने नदीपात्रात सिमेंट खांब काढून सीमा निश्चित केली आहे.

अखेर बावनथडी नदीपात्रात रेतीसाठी सीमांकन
मोहन भोयर
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवरून वाहणाऱ्या बावनथडी नदीपात्रात होणारी रेती तस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने नदीपात्रात सीमांकन निश्चित केले आहे. त्यासाठी नदीपात्रात सिमेंट खांब रोवण्यात आले असून महसूल प्रशासनाने प्रथमच ही कारवाई केली, हे विशेष.
बावनथडी नदी राज्याचे शेवटचे टोक आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमा नदीने निश्चित केल्या आहेत. मध्यप्रदेश शासनाने बालाघाट जिल्ह्यातील सर्वच नदी घाटांचे लिलाव केले परंतु तुमसर तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव झाले नाही. तुमसर तालुक्यातील वारपिंडकेपार गावाजवळून बावनथडी नदी वाहते. नकाशावरून महाराष्ट्राच्या हद्दीत तालुका महसूल प्रशासनाने नदीपात्रात सिमेंट खांब काढून सीमा निश्चित केली आहे.
नदीपात्र विस्तीर्ण आहे. दोन्ही राज्याच्या सीमेतील नदीपात्रात मोठा रेती साठा उपलब्ध आहे. मध्यप्रदेश शासनाने बालाघाट जिल्ह्यातील सर्वच रेतीघाटांचा लिलाव केला आहे. नदीपात्रात सीमा कुठून कुणाची सीमा सुरु होते हे कळत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या सीमेतून रेतीचे उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी तालुका महसूल प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. यावर महसूल प्रशासनाने दखल घेऊन नदीपात्रातील सीमा निश्चित केल्या.
त्यामुळे रेती चोरीला आळा बसण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशातील बामणी, बोनकट्टा येथील सीमा महाराष्ट्रालगत आहेत.
फिरत्या पथकाची गरज
रेती चोरीला सीमांकनामुळे चाप बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यासाठी महसूल प्रशासनाने फिरते पथक नियुक्त करण्याची गरज आहे. रात्रीच्या सुमारास राज्याच्या हद्दीतून रेती उत्खनन होत असल्याची माहिती आहे. मध्यप्रदेश शासनाने रेती घाट लिलाव करताना क्षेत्र निश्चित केले नाही. त्यामुळे तेथील रेती कंत्राटदार संपूर्ण नदीपात्रातून रेतीचे उत्खनन करीत असल्याची माहिती आहे.