शासकीय कर्मचाऱ्यांना सणासुदीची भेट! महागाई भत्त्यात २% वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 18:06 IST2025-08-21T18:03:16+5:302025-08-21T18:06:17+5:30
वेतनात वाढ : आठ महिन्यांची थकबाकीही मिळणार

Festive gift for government employees! 2% increase in dearness allowance
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वीच शासकीय कर्मचारी आणि सेवानिवृत्तधारकांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ केली आहे. परिणामी ऐन सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या हातात आगामी वेतनात वाढ मिळणार आहे.
जिल्ह्यात ढोबळमानाने आकडेवारीवर नजर घातल्यास शासकीय, निमशासकीय व सेवानिवृत्तधारकांची संख्या २५ हजारांपेक्षा अधिक आहे. राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वीच शासकीय कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त धारकांना आनंदाची बातमी दिली आहे. महागाई भत्त्यात (डीए) दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. याचा थेट लाभआगामी महिन्याच्या त्यांच्या वेतनात रोख स्वरुपाने मिळणार आहे. ही वाढ जानेवारीपासून दिली जाणार आहे.
जिल्ह्यात २५ हजार कर्मचारी, पेन्शनर्सला लाभ
वाढीव महागाई भत्त्याचा लाभजिल्ह्यातील शासकीय व सेवानिवृत्त अशा एकूण २५ हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे. सात महिन्यांची थकबाकी त्यांच्या वेतनात समाविष्ट केली जाणार आहे.
सणासुदीत हाती पैसा खुळखुळणार
ऐन सणासुदीच्या काळात शासनाने डीए मध्ये वाढ केल्याने कर्मचारी व पेन्शनर्सच्या हातामध्ये वाढीव रक्कम मिळणार आहे.
काय आहे महागाई भत्त्याचा नियम ?
महागाईचा दर वाढला तर शासन कर्मचाऱ्यांच्या वेतनातही वाढ करीत असते. वर्षातून दोनवेळा महागाई भत्त्यात सहसा वाढ केली जाते. निर्देशांकाप्रमाणे ही वाढ होत असली तरी शासन तो लाभ केव्हा घोषीत करेल हे त्यांच्यावर अवलंबून असते. मात्र थेट लाभ कर्मचारी आणि सेवानिवृत्ती धारकांना होत असतो.
महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ
राज्य सरकार आपल्या कर्मचारी व सेवानिवृत्तधारकांना ५३ टक्के महागाई भत्त्यासह वेतन देत होती. दरम्यान घोषणेप्रमाणे दोन टक्के डीए मध्ये वाढ करण्यात आली आहे. परिणामी आता महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरुन ५५ टक्के झाला आहे. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या थकबाकीसह फरकाची रक्कम एकत्रितपणे वेतन मिळत असलेल्या खात्यात दिली जाणार आहे.