जिल्ह्यातील बाजारपेठांवर पितृपक्षाची छाया
By Admin | Updated: September 14, 2014 23:54 IST2014-09-14T23:54:14+5:302014-09-14T23:54:14+5:30
गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत आलेली तेजी आणि पुढच्या काळात निवडणुका असल्याने ती कायम राहण्याची आलेली संधी मधल्या काळातच आलेल्या पितृपक्षामुळे काही अंशी का असे ना ओसरली आहे.

जिल्ह्यातील बाजारपेठांवर पितृपक्षाची छाया
भंडारा : गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत आलेली तेजी आणि पुढच्या काळात निवडणुका असल्याने ती कायम राहण्याची आलेली संधी मधल्या काळातच आलेल्या पितृपक्षामुळे काही अंशी का असे ना ओसरली आहे.
सर्वच बाजारपेठांमध्ये सध्याच्या काळात मंदीचे चित्र आहे. जग झपाट्याने बदलत असताना आणि त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा पगडा असताना जुन्या चालीरीतीवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या सध्या तरी कमी झालेली नाही. त्यामुळेच पितृपक्षाचा परिणाम बाजारपेठांमधील उलाढालीवर दिसून येत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. पितृपक्षाचा हा काळ वर्षानुवर्षे बाजाराला निषिद्ध का आहे, हे उमगत नसले तरी या काळात व्यवहार बंदच असतात. या पक्षात कोणताही मोठा व्यवहार होत नाही. जमीन, सोन्याची खरेदी-विक्री किंवा इतरही अनेक बाबी या काळात शुभ मानल्या जात नाहीत.
फुलांच्या बाजारावर परिणाम
पितृपक्षाच्या अखेरीस फुलांचा बाजार मंदीतच असून नवरात्र सुरू होईपर्यंत हे भाव असेच राहणार आहेत. पितृपक्षात फुले कोमजलेलीच आहे. गणेशोत्सवात जितकी कमाई झाली त्याच्या काही पटीने या पंधरा दिवसांत तोटा झाला आहे. पितृपक्षात सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचा प्रघात आहे. त्यामुळे फुलांचे नुकसान होत असून अगदीच मातीमोल भावाने फुले विकावी लागत आहेत . गणेशोत्सवात जी फुले ३०० रुपयांपर्यंत जाऊन ठेपली होती ती आज ८० रुपयांपर्यंत घसरली आहेत. तसे पाहता पितृपक्षात फुलांचा बाजार का मंदावतो हे गणित उलगडत नसल्याचे फूलविक्रेत्यांनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीला ब्रेक
गणेशोत्सवाच्या आनंदोत्सवासोबतच खरेदीचा आनंद पितृपक्षामुळे ओसरल्याचे चित्र शहरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या शोरूम्समध्ये दिसत आहे. या क्षेत्रातील खरेदी तब्बल ६० ते ७० टक्क्यांनी घटल्याचे व्यावसायिकांचे मत आहे. अशा वातावरणामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांचेही डोळे नवरात्रोत्सवाकडे लागले आहेत. एलईडी, एलसीडी, फ्रीज, वॉशिंग मशीन्स, डीव्हीडी प्लेयसर्पासून ते डीटीएच विक्रेत्यांपर्यंत साऱ्यांनाच मंदीचा फटका बसतो आहे. सध्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने व शोरूम्समध्ये ग्राहकांची वर्दळ दिसत असली तरीही, प्रत्यक्षात ती केवळ 'वॉकिंग' अर्थात एखादे प्रॉडक्ट पाहून ते निश्चित करून जाणे हाच हेतू असतो. दसऱ्यापर्यंत मंदी कायम राहणार असल्याने व्यावसायिक 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत. दसरा ते दिवाळीदरम्यान मुहूर्त कॅश करण्याची व्यावसायिकांनी तयारी सुरू केली आहे.
बांधकामे जोरात
बिल्डर्सनी दिलेल्या आश्वासनानुसार बांधकामे पूर्ण करण्याकडे कल असल्याने शहरातील सर्वच ठिकाणी बांधकाम जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीत घरांचा ताबा देण्यासाठी अनेक बिल्डर्संनी बांधकामाला वेग दिला आहे. शहरात रिअल इस्टेट क्षेत्र जोरात असल्याने शहराच्या विविध भागात अनेक बांधकाम प्रकल्पांचे काम वेगात आहे.
कापड बाजार 'फिफ्टी-फिफ्टी'
पितृपक्षात फटका बसणारा मोठा घटक म्हणून कापड व्यवसाय ओळखला जातो. जुन्या रूढी आणि परंपरेनुसार पितृपक्षात नवीन कपडे खरेदी केले जात नाहीत. त्यामुळेच पंधरवड्यात कापड व्यवसायावर बऱ्यापैकी परिणाम होतो. यंदा मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. पितृपक्षातील फटका लक्षात घेत रेडिमेड व्यावसायिक विविध स्कीम्सद्वारे ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.
शहरातील शॉपिंग मॉलमधील स्कीम्समुळे कपड्यांची बऱ्यापैकी उलाढाल होत आहे. पितृपक्षानंतर येणारी लग्नसराईदेखील कारणीभूत मानली जाते. अनेकांनी पितृपक्षानंतर दरवाढ होण्याचा धसका घेत त्यापूर्वीच लग्नाची खरेदी केली आहे. दुकानदारही जुना स्टॉक क्लिअरन्सवर भर देतात. त्यामुळे बाजारात नवीन व्हेरायटी दिसून आल्या नाहीत. साधारण नवरात्रीच्या तीन ते चार दिवस आधी नवीन माल मागवला जातो. यात नवरात्री व दसऱ्याची खरेदी डोळ्यासमोर ठेवून माल भरला जातो. (नगर प्रतिनिधी)