अतिउत्साहामुळे आनंदावर विरजण; लग्न समारंभात आतषबाजी; तीन वऱ्हाडी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2023 17:27 IST2023-05-03T17:27:12+5:302023-05-03T17:27:47+5:30
Bhandara News तुमसर तालुक्यातील विहीरगाव येथील एका विवाह समारंभात मंगलाष्टके संपताच अतिउत्साही युवकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. मात्र फटाके उडून थेट वऱ्हाड्यांच्या अंगावर येऊन पडल्याने तिघे जण गंभीर भाजले गेले.

अतिउत्साहामुळे आनंदावर विरजण; लग्न समारंभात आतषबाजी; तीन वऱ्हाडी जखमी
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : तुमसर तालुक्यातील विहीरगाव येथील एका विवाह समारंभात मंगलाष्टके संपताच अतिउत्साही युवकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. मात्र फटाके उडून थेट वऱ्हाड्यांच्या अंगावर येऊन पडल्याने तिघे जण गंभीर भाजले गेले. यामुळे लग्नाचा आनंद सोडून जखमी वऱ्हाड्यांच्या उपचारासाठी पाहुण्यांना धावावे लागले.
मनोहर तुमसरे (५०, कुलपा ता. तिरोडा, जि.गोंदिया), सुभाष खडोदे (५०, नागपूर), उमेश चाणोरे (४५, सेलोटी जि. गोंदिया) अशी भाजलेल्या वऱ्हाड्यांची नावे आहेत. यापैकी मनोहर तुमसरे यांच्यावर तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.तर उर्वरित दोन जखमीवर त्यांच्या स्वगावी उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
तालुक्यातील विहीरगाव येथे राजकुमार जांगळे यांच्या मुलीच्या लग्न समारंभाचा कार्यक्रम २ मे रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. लग्नासाठी गो़दिया जिल्ह्यातील फुलचुर येथील वरपक्षाकडील आणि विहीरगाव येथील वधु पक्षांकडील पाहुणे एकत्रित जमले होते. मंगलाष्टके संपताच वर पक्षाकडील तरुणांनी मंडपाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करीत असताना जळालेला फटाका अचानकपणे पाहुण्यांच्या अंगावर पडला. यात हे तीन व्यक्ती भाजल्याने जखमी झाले. रात्री १० वाजता ही घटना घडली.