खाद्यतेलाने महागाईत ‘तेल’ ओतले; 55 रुपयांची झाली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:36 IST2021-04-01T04:36:01+5:302021-04-01T04:36:01+5:30
भंडारा : कोरोना संकटकाळात किराणा साहित्यांच्या किमतीत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यात खाद्यतेलाचे भाव चांगलेच वधारले असून ...

खाद्यतेलाने महागाईत ‘तेल’ ओतले; 55 रुपयांची झाली वाढ
भंडारा : कोरोना संकटकाळात किराणा साहित्यांच्या किमतीत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यात खाद्यतेलाचे भाव चांगलेच वधारले असून प्रती किलोमागे ५५ रुपयांची साधारणत: वाढ झाली आहे. परिणामत: सर्वसामान्यांना याचा सर्वाधिक फटका बसला असून त्यांचे आर्थिक बजेट बिघडविले आहे.
भाजीपाला, किराणा व फळांच्या किमतीतही वाढ झाल्याचे दिसून येते. तेल व मिरची मसाले यांच्या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. ऐन सणासुदीच्या काळातही तेलाचे दर वाढले होते. दिवाळीनंतर तेलाचे भाव कमी होतील अशी आशा होती. मध्यंतरी १०९ रुपये किलोच्या भावाने खाद्यतेल मिळायचे. आता सोयाबीन असो कि फल्लीतेल सर्वच खाद्यतेलांचे भाव चांगलेच वाढले आहे. आरोग्याच्या दृष्टीने डबल व ट्रीपल फिल्टर खाद्यतेलाला चांगलीच मागणी असते. मात्र विविध कारणांनी खाद्यतेलाच्या भाववाढ सर्वसामान्यांचे टेंशन वाढविणारी बाब ठरली आहे.
आधीच कोरोना संकटकाळामुळे अनेकांवर उपासमारीचे संकट बळावले असताना त्यातच जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीमुळे समस्येत अधिकच वाढ झाली आहे. राज्य शासनाने यावर उपाययोजना करण्याची मागणी गरीब, गरजू व मध्यमवर्गीय कुटुंब करीत असले तरी वर्षभरापासूनचे हे रडगाणे संपायचे नाव घेत नाही.
अजूनही त्यात वाढ होणार काय, अशीच चर्चा बाजारपेठेत ऐकावयास मिळत आहे. प्रत्येकच वस्तू महाग होत असेल तर बजेटमध्ये घर चालवायचे तरी कसे असा प्रश्न गृहिणींसमोर निर्माण झाला आहे. आधीच गॅस सिलिंडर्सच्या दरामुळे अनेकांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच खाद्यतेलाच्या भाववाढीमुळे आगीत अजून तेल ओतण्याचे कार्य सुरु आहे काय, असेच जाणवायला लागले आहे. यावर गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.
ग्रामीण भाग असो की शहरी. तेल ही जीवनावश्यक वस्तू आहे. तेलाच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अन्य किराणा दराच्या साहित्यातही वाढ झाल्याचे दिसून येते. याचा फटका आम्हा गृहिणींना सहन करावा लागत आहे. गत दीड वर्षापूर्वी कांद्याने रडू आणले होते. आता तशीच स्थिती खाद्यतेलाबाबत दिसून येत आहे. यावर लक्ष देणे गरजेचे आहे.
-दीक्षा साखरे, गृहिणी
सणासुदीच्या काळातही तेलाचे भाव गगनाला भिडले होते. आता तर कहरच झाला आहे. प्रती किलोमागे ५० रुपयांची वाढ गरीबांसाठी मारक ठरणारी आहे. हातावर कमाविणे व पानावर खाणाऱ्यांची चांगलीच कोंडी होत आहे. यावर उपाययोजना करुन तेल दरवाढीबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आमचे तर आर्थिक बजेटच बिघडले आहे.
-मनिषा सेलोकर, गृहिणी
पाहता पाहता तेलाचे दर चांगलेच वधारले आहे. महिन्याकाठी १२०० रुपयांचे किराणा साहित्य आणायचे. आता १५०० च्या वर किराणा साहित्य आणत आहोत. यात सर्वाधिक दरवाढ तेलामुळे झाली आहे. अशीच स्थिती राहिली तर तेल खावे की नाही असा प्रश्न निर्माण होईल. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करुन तेलाच्या भाव वाढीबाबत योग्य निर्णय घेतला पाहिजे.
-दुर्गा नंदनवार, गृहिणी
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी खाद्यतेलांच्या भावात हमखास भाववाढ झाली आहे. याला अनेक कारणे आहेत. सर्वसामान्य नागरिक बहुतांशपणे सोयाबीन तेलाला पसंती देतात. सोयाबीन तेलात प्रती किलो मागे ४० ते ५५ रुपयापर्यंत वाढ झाली आहे. १४०० रुपयांना मिळणारे टीन आता २२५० पर्यंत गेले आहे. दरवाढीचा फटका आम्हालाही बसला आहे. तेलही जीवनावश्यक वस्तू असल्याने त्याची किंमत आवाक्यात असली पाहिजे.
-राजेंद्र खेडीकर, किराणा व्यापारी
कशामुळे झाली वाढ
तेल निर्मिती होणाऱ्या साहित्यांमध्ये वाढ झाल्याने ही वाढ झाली आहे. त्यासोबतच करवाढीचा बोजाही तेलाच्या दरवाढीत दिसुन येतो. याचा सरळसरळ फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे.
मार्चमध्ये वाढ
गत वर्षभरात खाद्य तेलाच्या भावात वाढ झाली मात्र मार्च महिन्यात सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळेच बजेट बिघडले आहे.