किडींमुळे ८,४०९ हेक्टरमधील धानपिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:38 IST2017-12-26T22:38:27+5:302017-12-26T22:38:51+5:30

किडींमुळे ८,४०९ हेक्टरमधील धानपिकांचे नुकसान
आॅनलाईन लोकमत
मोहाडी : यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. अर्ध्याअधिक रोवणीही उशिरा झाली. त्यामुळे निश्चितच धानाच्या उत्पादनात घट येईल असे शेतकऱ्याला जाणीव झाली होती. त्यात धानपिकावर किडीने हल्ला चढविला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अर्ध्यापेक्षा कमी धानाचे पिक आले आहे.
निसर्गाने आधी दगला दिला. अनेकांना भात रोपाची दुबार पेरणी करावी लागली. जास्त दिवसाचे रोपी काही शेतकºयांनी तशीच पाडून ठेवली होती. काही शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने उशिरा धानाची रोवणी केली. इथेही पावसाने दगा दिला. धान पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागली. दुसरीकडे गोदामाअभावी धान उघड्यावर आहेत.
हो नाही म्हणता पेंच प्रकल्पाचे पाणी सुटले. त्यामुळे काही प्रमाणात धानाचे पीक तरले. ओंब्यावर धानपीक आले. पण शेतकऱ्यांच्या दुर्देवी नशिबाने साथ सोडली नाही. धानाच्या ओंब्या भरत असताना किडींनी आक्रमण केले. तुडतुड्याने धान पिकाला तोडून टाकले. लोंबी मातीत मिसळल्या. काही शेतकऱ्यांन घाबरून ओल्या लोंबीचे धान कापून टाकले.
पण, नुकसान झालेच नाही. यावर्षी खरीप पिकावर निसर्गाचे दृष्टचक्र फिरत आहे. शेतकरी फार चिंतीत पडले आहेत. मळणी करतानीही शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून जावे लागत आहे. धानाची खोपी बघून मळणीचा दाम ठरविला गेला. उत्पादन कमी, तणस जास्त यामुळे मळणी मालक नुकसान करून घेण्यास तयार नव्हता. त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकरी पिळला गेला. उत्पादन दहा पोत्याचे किंमत वसूल वीस पोत्यांचे. हा यावर्षी अनुभव शेतकºयांनी घेतला.
तालुका कृषी अधिकारी, खंडविकास अधिकारी व तहसीलदार मोहाडी यांच्या संयुक्तपणे सर्वेक्षण करण्यात आला आहे. किडीमुळे बाधीत धान पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
३३ टक्केच्या खाली ३३,५७५ शेतकरी
दोन दिवसानंतर मोहाडी तालुक्याची अंतिम आणेवारी हाती येणार आहे. निश्चितच पन्नास पैशाच्या आत आणेवारी राहील असे संकेत प्रशासनाने दिले. तथापि तुडतुड्यामुळे धानपिकाचे राजस्व मंडळ निहाय सर्वेक्षण करण्यात आले. त्यात मोहाडी तालुक्यातील १०८ गावात ३३ टक्केच्या वर ८ हजार ४०९ हेक्टर मध्ये धान पिकाचे नुकसान तुडतुड्याने केले आहे. ३३ टक्केच्या खाली नुकसान १३ हजार ८८४ हेक्टर क्षेत्रामध्ये झाले आहे. यात ३३ टक्केच्या वर नुकसान पात्र शेतकरी ३१ हजार ५६९ तर ३३ टक्केच्या खाली ३३५७५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.