अन् चालकाने मारली धावत्या ट्रकमधून उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST2020-06-17T05:00:00+5:302020-06-17T05:01:09+5:30
ट्रकला थांबवून कारवाई करण्यात आली. ट्रक पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी मोहाडीकडे नेण्यास सांगण्यात आले. चालकासोबत गृहरक्षक दलाचा जवान त्या ट्रकमध्ये बसला. ट्रक मोहाडीकडे निघाला. मात्र काही अंतर जात नाही तोच चालकाने धावत्या ट्रकमधून उडी मारली आणि धुम ठोकली. ट्रकमध्ये बसलेला गृहरक्षक दलाचा जवान घाबरला. त्यानेही खाली उडी मारली.

अन् चालकाने मारली धावत्या ट्रकमधून उडी
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : रेती तस्करीचा ट्रक महसूल अधिकाऱ्यांनी पकडला. गृहरक्षक दलाच्या जवानाला बसवून ट्रक पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी मोहाडीकडे जाण्यास सांगितले. रेतीने भरलेला ट्रक मोहाडीकडे निघाला. मात्र काही कळायच्या आत रोहणा - दहेगाव दरम्यान चालकाने चक्क धावत्या ट्रकमधून उडी घेतली. हा प्रकार पाहून गृहरक्षक दलाच्या जवानानेही पाठोपाठ उडी मारली. सुदैवाने ट्रक एका नालीत जाऊन थांबला. मोठा अनर्थ टळला.
रेती तस्करीसाठी कसा आटापिटा सुरु आहे याचा प्रत्यय मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास महसूल अधिकारी आणि पोलिसांना याची देही याची डोळा बघता आला.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरु आहे. रेती तस्करांवर नियंत्रण ठेवणे महसूल आणि पोलीस प्रशासनालाही कठीण झाले आहे. महसूल प्रशासनाने रेतीचोरांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार केले. त्याच पथकातील नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे मंगळवारी कामगिरीवर होते.
दुपारी २ वाजताच्या सुमारास रोहणा - दहेगाव रस्त्यावर एमएच ३६ एफ ३४८८ क्रमांकाचा रेती भरलेला ट्रक आला. त्या ट्रकला थांबवून कारवाई करण्यात आली. ट्रक पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी मोहाडीकडे नेण्यास सांगण्यात आले. चालकासोबत गृहरक्षक दलाचा जवान त्या ट्रकमध्ये बसला. ट्रक मोहाडीकडे निघाला. मात्र काही अंतर जात नाही तोच चालकाने धावत्या ट्रकमधून उडी मारली आणि धुम ठोकली. ट्रकमध्ये बसलेला गृहरक्षक दलाचा जवान घाबरला. त्यानेही खाली उडी मारली. त्याला किरकोळ दुखापत झाली. चालकाविना ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन नालीत जाऊन रुतला. हा प्रकार पाहून महसूलच्या पथकाने ट्रक चालकाचा पाठलाग केला. परंतु तो हाती लागला नाही.
आता फसलेला हा ट्रक काढण्यासाठी वरठी येथून मशीन बोलाविण्यात आली.
चालकांची नवी शक्कल
रेती तस्करीतील ट्रक पकडला तर अधिकाऱ्यांच्या हाती लागू नये म्हणून चालकांनी नवीन शक्कल काढली आहे. रस्त्याच्या कडेला ट्रक कुठेतरी फसवून ठेवायचा. रात्रीची प्रतीक्षा करायची. ताब्यात आलेले वाहन निगरानी करणाऱ्याला पटवायचे आणि ट्रक तेथून घेऊन पळून जायचे. परंतु मंगळवारी नालीत घुसविलेल्या ट्रकचालकाची कल्पना यशस्वी होऊ दिली नाही. नायब तहसीलदार सोनकुसरे व तलाठी तेथे तळ ठोकून आहेत.