डॉक्टरांचे असहकार आंदोलन सुरूच

By Admin | Updated: May 31, 2014 23:16 IST2014-05-31T23:16:43+5:302014-05-31T23:16:43+5:30

वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) असहकार आंदोलन सुरू केले आहे. दुसरीकडे रूग्णालयात डॉक्टर नसल्याने रूग्णांचे हाल

Doctor's non-cooperation movement continues | डॉक्टरांचे असहकार आंदोलन सुरूच

डॉक्टरांचे असहकार आंदोलन सुरूच

धरणे :  २ जूनपासून काम बंद
भंडारा : वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) असहकार आंदोलन सुरू केले आहे. दुसरीकडे रूग्णालयात डॉक्टर नसल्याने रूग्णांचे हाल अन् हाल होत आहे.
सार्वजनिक  आरोग्य विभागातील जवळपास १२ हजार वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांची शिखर संघटना मॅग्मो आहे. महाराष्ट्रातील जवळपास ८0 टक्के जनतेला आरोग्य सुविधा पुरविणार्‍या व ग्रामीण भागामध्ये कार्यरत असणार्‍या या अशा वैद्यकीय अधिकार्‍यांकडे काही कारणाने शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असून त्यांचे अनेक न्याय्य प्रश्न प्रदीर्घ काळापासून प्रलंबित राहिलेले आहेत. वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे कार्यरत आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभाग मधील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अत्यंत महत्वाच्या व जिव्हाळ्याच्या प्रश्नासंदर्भात शासनाचे नेहमीच उदासीन धोरण राहिले आहे. त्यामुळे डॉक्टर्स शासकीय सेवेकडे आकर्षित होत नाहीत.
 याचा परिणाम शासकीय सेवेमध्ये तज्ञ डॉक्टरांचा अभाव दिसून येत आहे व याचा थेट परिणाम गोरगरीब जनतेच्या आरोग्यावर होत आहे. गेल्या तीन वर्षात मुख्यमंत्र्यांसहीत, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, अपर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग या प्रमुख मान्यवरांनी यापूर्वीच मॅग्मो संघटनेच्या सर्वच जिव्हाळ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी तात्काळ करू, असे अभिवचन मॅग्मो संघटनेस या सर्व मान्यवरांनी दिले होते.
यात सन २00९-१0 मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकारी यांना पुर्वलक्ष लाभ द्यावा, अस्थायी जवळपस ७८९ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी गट ब व अस्थायी जवळपास ३२ बीडीएस वैद्यकीय अधिकारी गट ब यांचे सेवा समावेश करावा, १ जानेवारी २00६ पासून राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकार्‍यांना ६ वा वेतन आयोग लागू करावा, राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांना केंद्रशासन व वैद्यकीय शिक्षण विभागाप्रमाणे उच्च वेतन देण्यात यावे, आदी ११ मागण्यांचा समावेश आहे.
मागण्यांची पूर्तता न  झाल्याने वैद्यकीय अधिकार्‍यांनी आंदोलनाचे बंड पुकारण्यात आले आहे.
यात दि.२८ मे पासून सर्व बैठकांवर बहिष्कार घालणे, दि.३१ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्याचे ठरले होते. त्यानुसार हे आंदोलन करण्यात येत आहे. दि.२ जूनपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला असल्याचे संघटनेने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे.  (शहर प्रतिनिधी)
 

Web Title: Doctor's non-cooperation movement continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.