विद्यार्थ्यांना भातच खाऊ घालायचा का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:23 IST2017-11-26T00:22:31+5:302017-11-26T00:23:23+5:30
अनेक शाळांमधील तांदूळ व तेल, तिखट, मीठ असा धान्यादी साठा संपला आहे. संघटनांच्या प्रभावाखाली येऊन प्रशासनातर्फे तांदळाचा साठा शाळेत पोहचता करीत आहे.

विद्यार्थ्यांना भातच खाऊ घालायचा का?
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : अनेक शाळांमधील तांदूळ व तेल, तिखट, मीठ असा धान्यादी साठा संपला आहे. संघटनांच्या प्रभावाखाली येऊन प्रशासनातर्फे तांदळाचा साठा शाळेत पोहचता करीत आहे. तथापि, शालेय पोषण आहारात केवळ भातच विद्यार्थ्यांना खाऊ घालायचा काय असा सवाल मुख्याध्यापकांनी विचारला आहे. धान्यादी मालाचा पुरवठा करावा, या मुख्य मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना गटशिक्षणाधिकारी रमेश गाढवे यांच्यामार्फत देण्यात आले.
मोहाडी तालुक्याच्यावतीने जिल्हा परिषद व खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांनी शालेय पोषण आहाराच्या अडचणी बाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाºयांना निवेदन सादर केले. अनेक शाळांमधील तांदळाचा साठा संपला आहे. त्यामुळे उसणवार तांदूळ घेण्याची वेळ मुख्याध्यापकांवर आली आहे. काही शाळांना उसणवार धान्य मिळत नसल्याने शाळांमधील मुलांवर ताट्या वाजविण्याची वेळ आली आहे.
धान्यादी मालाची खरेदी केली त्या शाळांच्या मुख्याध्यापकांना अजुनही बिलाची रक्कम दिली गेली नाही. त्यामुळे हे मुख्याध्यापक आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहे. शालेय पोषण आहार योजने अंतर्गत २०१७-१८ नवीन पुरवठाधारक अजुनही निश्चित केला गेला नाही. २०१६-१७ या वर्षासाठा केलेल्या करारनाम्याची मुदत १४ जून व १६ जून २०१७ रोजी संपुष्टात आली आहे.
तथापि, जिल्हास्तरावरून पुरवठादारांकडून तांदूळ पुरविण्याची कारवाई करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने केले आहेत, असे असले तरी वेळेवर धान्य पुरवठा होत नसल्याने भातही कसे शिजवायचे असा प्रश्न शाळांना पडला आहे. मुख्याध्यापक संघटनांनी विषय रेटला त्यामुळे धान्याचा पुरवठा केला जात आहे. तथापि, धान्यादी मालाची खरेदीची तात्पुरती कार्यवाही मुख्याध्यापकांनी करावी, असे निर्देश देण्यात आले होते. सप्टेंबर २०१७ ला पंचायत समिती सभागृहात शालेय पोषण अधीक्षक, गटशिक्षणाधिकारी यांनी १५ दिवसानंतर सुरळीत होईल. धान्यादी साहित्याची मुख्याध्यापकांनी खरेदी करावी. १५ दिवसात खरेदीचे बिले देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, तीन महिने होऊनही बिलाची रक्कम मिळाली नाही. शासनस्तरावर धान्यादी मालाचा पुरठादार नेमता आला नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा की शालेय पोषण आहारासाठी साहित्य खरेदी करण्यावर पगार खर्च करायचा असा पेच मुख्याध्यापकांना पडला आहे. माहे जुलै ते माहे नोव्हेंबर २०१७ चे इंधन खर्चाचे बिल देण्यात यावे, स्वयंपाकी व मदतनीसांचे मानधन दरमहा जमा करण्यात यावे, शाळांना गॅस कनेक्शन देऊन गॅस सिलिंडर द्यावे, बाजारभावाप्रमाणे भाजीपाला व पुरक आहार खर्च देण्यात यावा, या मागण्यांची पुर्तता ३० नोव्हेंबरपर्यंत करावी, असा इशारा मोहाडी तालुक्यातील मुख्याध्यापकांनी दिली आहे.
अन्यथा १ डिसेंबरपासून मोहाडी तालुक्यातील खाजगी व जिल्हा परिषद माध्यमिक शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविला जाणार नाही, अशा इशारा मुख्याध्यापक गोपाल बुरडे, राजकुमार बांते, दयालनाथ माळवे, प्रकाश करणकोटे, हिंमत तायडे, मार्तंड कापगते, कमला चौधरी, यशोदा येळणे, ओमप्रकाश चोले, राजू भोयर, हेमराज दहिवले, नंदलाल बिल्लोरे, सिंधू गहाणे, दिगांबर राठोड, उमेश पडोळे, वसंत मारवाडे, वसंत मारवाडे, गणराज बिसेन, करचंददास साखरे, एकनाथ उपरीकर, विनोद नवदेवे आदींनी दिला आहे.