सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मनस्ताप
By Admin | Updated: March 14, 2015 00:53 IST2015-03-14T00:53:21+5:302015-03-14T00:53:21+5:30
प्रशासन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महिन्याच्या एक तारखेला पेंशन देण्याचे आश्वासन देत असले तरी प्रत्यक्षात मात्र हे आश्वासन फोल ठरत आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मनस्ताप
भंडारा : प्रशासन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महिन्याच्या एक तारखेला पेंशन देण्याचे आश्वासन देत असले तरी प्रत्यक्षात मात्र हे आश्वासन फोल ठरत आहे. वर्षभरात हा प्रकार सुरु असल्याने पेन्शनसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याला जिल्हा प्रशासन कारणीभूत असून याचा थेट फटका सेवानिवृत्तधारकांना बसत आहे.
भंडारा जिल्हा परीषदमध्ये १९ पेन्शन अंतर्गत १,७९५ सेवानिवृत्त वेतनधारक आहेत. भंडारा पंचायत समितीमध्ये ८५० सेवानिवृत्त वेतनधारक आहेत. त्यांना एकूण ९० लक्ष अनुदानाची आवश्यकता असते. सदर अनुदान दर महिन्यात नियमितपणे प्राप्त होत नाही. त्यामुळे सेवानिवृत्तधारकांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला करता येत नाही.
यासंबधी जिल्हा प्रशासनाला विचारपूस केली असता त्यांना शासनाकडून अनुदान, वेतन नियमित पाठविण्यात जात नसल्याचे उत्तर मिळतात. स्थानिक पातळीवर अनुदान प्राप्त नसल्यास महाराष्ट्र कोषागार नियमाप्रमाणे संबधित विभागप्रमुखाने हमीपत्र देऊन कोषागारातून देयके पारीत करुन अनुदानाची उपलब्धता करण्याची गरज आहे. यानंतर सेवानिवृत्तधारकांच्या वेतनाची अदायगी केल्यास दर महिन्याला उशीरा वेतन होण्याची शक्यता सोडविली जावू शकते. मात्र हे होताना दिसत नाही.
भंडारा जिल्ह्यात एकूण २,१६८ सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांचे वेतन महिन्याच्या एक तारखेला झाल्याचे ऐकिवात नाही. वेतन एक तारखेला व्हावे, यासाठी जिल्हा परीषद सेवानिवृत्त संघटनेने आक्रमक पावित्रा घेण्याचा इशारा दिला आहे. (नगर प्रतिनिधी )