पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी
By Admin | Updated: February 26, 2015 00:29 IST2015-02-26T00:29:07+5:302015-02-26T00:29:07+5:30
वलनी येथील शिल्पा जांभुळकर हत्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या अक्षम्य दिरंगाई व पूर्वीच कार्यवाही न केल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ताबडतोब निलंबित यावे, ...

पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी
भंडारा : वलनी येथील शिल्पा जांभुळकर हत्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या अक्षम्य दिरंगाई व पूर्वीच कार्यवाही न केल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ताबडतोब निलंबित यावे, अशी मागणी महिला अत्याचार विरोधी सामाजिक न्याय मंचच्या पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील वलनी या गावातील रहिवासी शिल्पा जांभुळकर (१६) या शाळकरी मुलीचा निर्घुणपणे खून करण्यात आला. सदर मुलीचे वडिल रामदास जांभुळकर यांनी सदर प्रकरणी अटक केलेला इसम हा माझ्या मुलीचा छळ करित असल्याची तक्रार पो.स्टे. पवनी येथे यापुर्वीच केली होती. परंतु पोलीसांनी देवा ईश्वर गभने (२५) रा. वलनी याचेवर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे शिल्पा जांभुळकर हिची भरदिवसा हत्या करण्यात आली. खून झाल्यानंतरही पोलीसांनी योग्य कार्यवाही केली नाही. भंडारा जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक कैलास कणसे यांनी महिला अत्याचारावर पायबंध घालण्यासाठी कोणतीही उपाययोजना राबविल्या नाहीत, असे निवेदनात नमुद आहे. त्याचेच पर्यवसान वलनी येथील शिल्पा जांभुळकर हिच्या खून प्रकरणात झाले. याला सर्वस्वी पोलीस विभाग जबाबदार असून भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक कणसे यांची उदासीनता कारणीभूत आहे.
भंडारा जिल्ह्यातील महिला दक्षता समित्यांवर केवळ कागदोपत्री महिलांची नावे आहेत. प्रत्यक्षात कार्यशून्य आहे. तेव्हा सदर महिला समित्या रद्द करून घडाडीच्या महिलांना प्राधान्य द्यावे. सदर प्रकरणी त्वरीत कार्यवाही करावी अन्यथा जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.(नगर प्रतिनिधी)