देव्हाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा हल्लाबोल
By Admin | Updated: July 17, 2014 23:54 IST2014-07-17T23:54:45+5:302014-07-17T23:54:45+5:30
देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्याची त्वरीत स्थानांतरण करून आरोग्य केंद्रातील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी देव्हाडी तथा स्टेशनटोली येथील

देव्हाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा हल्लाबोल
तुमसर : देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्याची त्वरीत स्थानांतरण करून आरोग्य केंद्रातील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी देव्हाडी तथा स्टेशनटोली येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे. अन्यथा आरोग्य केंद्रासमोरच आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
देव्हाडी येथे राज्य शासनाने सुमारे २२ वर्षापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु केले होते. १५ वर्षापूर्वी येथे एक कोटी रुपये खर्च करून प्रशस्त जागेत प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधकाम करण्यात आले. या केंद्रांतर्गत २४ गावे परिसरातील येतात. परंतु सातत्याने हे उपकेंद्र रुग्णांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी असमर्थ ठरले आहे. येथे डॉक्टर्स व इतर कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत.
दि. १२ जून रोजी या प्राथमिक आरोग्य केंद्रात एक सभा घेण्यात आली. या सभेत ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांनी स्थानांतरणाची मागणी केली होती. त्यानंतर चार कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात आले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डॉ.कुरैशी सुमारे येथे ८ ते १० वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांचे स्थानांतरण का करण्यात आले नाही? असा प्रश्न ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यंनी उपस्थित केला आहे. सध्या डॉ.कुरैशी यांचेकडे तालुका अधिकाऱ्याचा प्रभार आहे. यामुळे ते देव्हाडी येथे सेवा देण्यास असमर्थ ठरत आहेत. देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करणे व डॉ.कुरैशी यांचे त्वरीत स्थानांतरण करण्याची मागणी येथे जोर धरत आहे.
डॉ.कुरैशी मुख्यालयी राहत नाहीत. २४ गावाचे आरोग्य सध्या एका डॉक्टरांच्या खांद्यावर आहे. हे प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात येते. आरोग्याचा मूलभूत हक्कात समावेश होतो. सध्या येथील ग्रामपंचायत पदाधिकारी हक्काकरिताच उपोषणाचा मार्ग पत्करीत आहेत. देव्हाडीच्या सरपंचा सुनिता बिरणवारे, स्टेशनटोलीचे सरपंच आकाश उके, उपसरपंच शाम नागपुरे तथा सुकळी, तुडका, माजी पंचायत समिती सदस्यांनी याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. (तालुका प्रतिनिधी)