भंडारा : 'आमच्या शाळा-महाविद्यालयात कुठल्याही तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन होत नाही, आवारात कुठलेही तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध नाही तसेच सिगारेट, बिडी व गुटखा पुडीचे अवशेष आणि तंबाखूनी रंगलेल्या भिंती शाळेच्या आवारात नाही किंवा आढळून आल्या नाही' या आशयाचे घोषणापत्र प्रत्येक शाळेला भरून द्यावे लागणार आहे. मुख्याध्यापक व प्राचार्यांवर याची जवाबदारी राहणार आहे. शैक्षणिक संस्था व शाळांच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर निर्बंध घालण्यासाठी नवीन सूचना व अटींसह शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ७ जुलै रोजी आदेश दिले आहेत. यानुसार शालेय आवारातील छायाचित्रासह सदर घोषणापत्र प्राचार्य व मुख्याध्यापकांना जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करावे लागणार आहे. याबाबत शिक्षण विभागाकडून नियमित आढावा घेतला जाणार असून, सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सदर आदेशाच्या अंमलबाजवणीबाबत सूचना शिक्षण संचालक (प्राथमिक) व संचालक (माध्यमिक व उच्च माध्यामिक) यांनी सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी यांना द्यायच्या आहेत तसेच प्रत्येक जिल्हास्तरावर आदेशाची जवाबदारी संबधित गटविकास अधिकारी यांच्याकडे राहणार आहे. राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना निर्देश देऊन अहवाल शिक्षण विभागाला १५ दिवसांच्या आत राज्य शासनाकडे सादर करायचा आहे. (नगर प्रतिनिधी)
तंबाखुमुक्ती शाळांना भरावे लागणार घोषणापत्र
By admin | Updated: July 11, 2015 01:40 IST