जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने आईचा मृत्यू, मुलगा बचावला
By Admin | Updated: July 19, 2014 00:46 IST2014-07-19T00:46:15+5:302014-07-19T00:46:15+5:30
विद्युत तारेचा प्रवाह असलेल्या कृषीपंपाच्या

जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने आईचा मृत्यू, मुलगा बचावला
चिखलधोकडा येथील घटना : दोन दिवसांतील तिसरी घटना
लाखांदूर : विद्युत तारेचा प्रवाह असलेल्या कृषीपंपाच्या तारांमध्ये पाय अडकलेल्या बैलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असताना विजेच्या स्पर्शाने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. यात तिचा मुलगा बचावला असून त्याला लाखांदूर ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास चिखलधोकडा ता.लाखांदूर येथे घडली.
वनिता सोमेश्वर शहारे (४५) असे मृत महिलेचे नाव असून संतोष सोमेश्वर शहारे (२४) असे जखमी तरुणाचे नाव आहे. वैनगंगा नदीकाठावर शेती असल्यामुळे मोटारपंपाच्या सहाय्याने शेतीतून उत्पादन घेवून उदरनिर्वाह करतात. वैनगंगा नदीचे पाणी वाढत असल्यामुळे संतोषने मोटारपंप काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जवळच असलेल्या बैलांच्या पायामध्ये मोटारपंपचे तार गुरफटले. त्यानंतर संतोषने बैलांना तारामधून सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु या तारांमध्ये विजेचा प्रवाह असल्यामुळे त्याचा धक्का संतोषला बसला. त्यानंतर तो ओरडला.
यावेळी शेतातच काम करणाऱ्या भरत नागपुरे या शेतकऱ्याने बांबूने संतोषला वाचविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार दिसताच संतोषच्या आईनेही मुलाला वाचविण्यासाठी समोर आली. परंतु तिने तिच्या हाताचा स्पर्श जिवंत विद्युत तारांना झाल्यामुळे ती तारांना चिपकून राहिली. काही क्षणातच तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान जखमी मुलाला वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील दोन दिवसात विजेच्या तारांमुळे मुत्यूमुखी होण्याची लाखांदूर तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वी मासळ येथे उर्मिला अरुण लांजेवार व तिची मुलगी भाग्यश्री अरुण लांजेवार यांचा मृत्यू झाला होता. या घटनांमुळे लाखांदूर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी मर्ग दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक प्रशांत कुलकर्णी करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)