खेडेपार टेकडीच्या अवैध उत्खननाने धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:08 AM2019-09-02T00:08:37+5:302019-09-02T00:09:37+5:30

खेडेपार येथील कोडोपेन टेकडीवर देवस्थान आहे. या देवस्थानालगतच अवैधरित्या आधुनिक यंत्रांनी उत्खनन केले जात असल्याने देवस्थानाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील मालगुजारी तलावामध्ये गिट्टी, बोल्डर घालून तलाव बुजविण्यात आला. कंत्राटदाराने शासनाची दिशाभूल केल्याने येथील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Danger by illegal excavation of a Khedepar hill | खेडेपार टेकडीच्या अवैध उत्खननाने धोका

खेडेपार टेकडीच्या अवैध उत्खननाने धोका

Next
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाला निवेदन : आदिवासी संघटनांमध्ये संताप, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील खेडेपार येथे समृद्ध खनिजांनी नटलेल्या टेकडीचे अवैधरित्या उत्खनन केले जात असल्याने परिसरातील गावांना धोका निर्माण झाला आहे. खनिजांचे उत्खनन तातडीने थांबविण्यात यावे अन्यथा परिसरातील आदिवासी बांधव तीव्र आंदोलन करतील, असा गंभीर इशारा ऋषी इनवाते यांच्यासह आदिवासी संघटनांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
खेडेपार येथील कोडोपेन टेकडीवर देवस्थान आहे. या देवस्थानालगतच अवैधरित्या आधुनिक यंत्रांनी उत्खनन केले जात असल्याने देवस्थानाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील मालगुजारी तलावामध्ये गिट्टी, बोल्डर घालून तलाव बुजविण्यात आला. कंत्राटदाराने शासनाची दिशाभूल केल्याने येथील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. निवेदनानुसार टेकडीची गिट्टी व बोल्डर काढण्याची लिज कलाबाई गोविंदराव बागडे यांना देण्यात आली. त्या लिजच्या व्यतिरिक्त इतरत्र खोदकाम व ब्लास्टींग करून उत्खनन सुरु आहे. खनीजपट्टाधारक यांच्या बाजूला मोकळी असलेली शासकीय जागा व रामचंद्र मडावी यांची जागा यासह बाजूला असलेली मोकळी शासकीय जागेमध्ये एका कंपनीने अवैधरित्या उत्खनन करून कोट्यवधीचा महसूल बुडविला आहे. दोषींवर दंडात्मक कारवाई करून उत्खननाचे काम बंद करावे, असे निवेदनात नमूद आहे.
खेडेपार येथील मालगुजार शेती शासनाने सरकारजमा करून ही शेती काही लाभार्थ्यांना वाटून दिली. ती जमीन कसून उत्पादन काढण्यासाठी देण्यात आली होती. त्यामधील जवळपास पाच ते सात शेतकऱ्यांनी ती जमीन एका कंपनीला भाडेस्वरुपात दिली. त्या जमिनीमध्ये गिट्टी, बोल्डर टाकून घर तयार करण्यात आले. त्यामुळे या परिसरातील जमीन बंजर झाली आहे. उत्खननामागे जिल्हा प्रशासनाचे काही अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी कंपनीला सहकार्य करून खेडेपारवासीयांच्या जीवनाशी खेळत असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. या संबंधी आदिवासी संघटनांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. जिल्हा प्रशासन आता कोणती कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.

रस्त्यांची झाली दैनावस्था
खेडेपार येथे सुरु असलेल्या उत्खननामुळे खेडेपार परिसरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. या मार्गावरून आवागमन करणे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहे. यापूर्वी खनिजांची वाहतूक करणाºया टिप्परने या परिसरातील अनेकांचा जीव गेला आहे. यासंबंधी तालुका प्रशासनाला निवेदने देण्यात आली. मात्र कारवाई शून्य आहे. येत्या आठवडाभरात जिल्हा प्रशासनाने ठोस कारवाई करावी अन्यथा खेडेपार परिसरातील नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Web Title: Danger by illegal excavation of a Khedepar hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.