साकोलीतही वाईन शॉपसमोर मद्य शौकिनांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST2020-05-10T05:00:00+5:302020-05-10T05:00:50+5:30
एवढी गर्दी तर राशनच्या दुकानातही पाहायला मिळाली नाही. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक घरातच होते. मात्र दारुची दुकान उघडताच तळीरामांनी एकच गर्दी केली. यावरून, ‘इंसान एक बोतल शराब के लिए, कतार में जिंदगी लेकर खडा हो गया, मौत का डर तो वहम था, आज नशा जिंदगी से बडा हो गया’ असे म्हणण्याची वेळ आली.

साकोलीतही वाईन शॉपसमोर मद्य शौकिनांची गर्दी
संजय साठवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : मागील दीड महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या भीतीमुळे अख्खा देश लॉकडाऊन आहे. भंडारा जिल्हा आॅरेंज झोनमध्ये असतानाच जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनंतर शनिवारपासून साकोली येथील वॉईनशॉप सुरु झाले. तालुक्यात एकच दारु दुकान सुरु झाल्याने परिसरातील मद्यप्रमींनी येथे एकच गर्दी केली.
एवढी गर्दी तर राशनच्या दुकानातही पाहायला मिळाली नाही. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक घरातच होते. मात्र दारुची दुकान उघडताच तळीरामांनी एकच गर्दी केली. यावरून, ‘इंसान एक बोतल शराब के लिए, कतार में जिंदगी लेकर खडा हो गया, मौत का डर तो वहम था, आज नशा जिंदगी से बडा हो गया’ असे म्हणण्याची वेळ आली.
लॉकडाऊनमुळे राज्यांचीच नाही तर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे शसनाने दारु दुकान सुरु करण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा रंगली आहे.
कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी भीतीपोटी लॉकडाऊनमध्ये घरीच राहणे पसंत केले आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या घरी रोजगाराअभावी जेवणाची अडचण झाली. मात्र मद्यशौकिनांना याचे सोयरसुतक नसावे. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळतेच दारूविक्रीचे दुकान उघडणार आहेत, अशी माहिती मिळताच तळीरामांनी दारु दुकान उघडताच दारु खरेदीसाठी रांग लावली.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र असे असले तरी दारु खरेदीसाठी लोकांचे लोंढेच्या लोंढे येतच होते. तर रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहनांचीही मोठी गर्दी झाली होती.
राज्य शासनाने एकीकडे कोरोनाचे संक्रमण थांबावे यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून लॉकडाऊन यश्स्वी केला. मात्र दारु दुकान उघडून क्षणास लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
फिजिकल डिस्टन्सिंग नियमाचा फज्जा
जिल्ह्यात दारूची दुकाने केव्हा उघडणार याची मद्यशौकिनांना चातकासारखी प्रतीक्षा होती. राज्यातील अन्य जिल्ह्यात दुकाने उघडताच भंडारा जिल्ह्यातील दारू दुकाने उघडतील अशी चर्चा गत आठवड्यात होती. मात्र दुकाने न उघडल्याने तळीरामांचा भ्रमनिरास झाला होता.
निर्णयानुसार साकोली येथील वाईन शॉप सुरु झाली आहे. ही माहिती मिळताच तालुक्यासह अन्य ठिकाणच्या तळीरामांनी साकोलीच्या वाईन शॉपमध्ये एकच गर्दी केली. वाईन शॉप मालकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी दुकानासमोर सर्कल तयार केले. बासाचे बॅरिकेटस् लावले असले तरी दारु विकत घेण्यासाठी लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला. एवढ्या उन्हातही अनकजण दारुसाठी रांगेत लागले, हे एक नवलच आहे. दुपारी ४ वाजतापर्यंत दारू विक्री सुरू होती.