भंडारा जिल्ह्यात बुधवारी ३८४ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी कुणी पॉझिटिव्ह आढळून आला नाही, तर एक व्यक्ती कोरोनामुक्त झाला. सध्या जिल्ह्यात सहा ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यात भंडारा, लाखनी आणि साकोली तालुक्यात प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. दरम्यान, कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेला डेल्टा प्लसचा एक रुग्ण भंडारा तालुक्यात आढळून आला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात घेतलेल्या या रुग्णाच्या नमुन्यांचा अहवाल ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात प्राप्त झाला. तोपर्यंत हा रुग्ण ठणठणीत बरा झाला होता. त्याच्या संपर्कातील कुणालाही डेल्टा प्लसची लक्षणे दिसून आली नाहीत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ४६ हजार ८०९ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात साठ हजार ८० व्यक्ती बाधित आढळून आलेत. त्यापैकी ५८ हजार ९४१ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली, तर ११३३ व्यक्तींचा कोरोनाने बळी गेला आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्के असून, सक्रिय रुग्णांची टक्केवारी ०.०१ टक्के आहे. मृत्युदर १.८९ टक्के असून, बुधवारी पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता.
बॉक्स
नागरिकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन
जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आगमन झाले असून, ही सर्वांसाठी धोक्याची सूचना आहे. असे असतानाही संपूर्ण बाजारपेठ खुली असल्याने नागरिकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. अनेकजण विनामास्क भटकताना दिसून येत आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, फिजिकल डिस्टन्सिंगचेही उल्लंघन केले जात आहे.