कोरोना संकट, रुसलेला पाऊस व सुखसमृद्धीसाठी ग्रामदेवतेला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:37+5:302021-07-08T04:23:37+5:30
करडी (पालोरा) : खरीप हंगामाच्या प्रारंभी दुसऱ्या टप्प्यातील कोरोना महामारी आटोक्यात आली. मृग व आर्द्रा नक्षत्र दमदार ...

कोरोना संकट, रुसलेला पाऊस व सुखसमृद्धीसाठी ग्रामदेवतेला साकडे
करडी (पालोरा) : खरीप हंगामाच्या प्रारंभी दुसऱ्या टप्प्यातील कोरोना महामारी आटोक्यात आली. मृग व आर्द्रा नक्षत्र दमदार बरसल्याने पेरण्या पूर्ण होऊन पऱ्ह्यांची रोवणीयोग्य वाढ झाली. सिंचनाची सुविधा असणाऱ्यांनी धडाक्यात रोवणी सुरू केली. परंतु आठवड्यापासून पावसाने दडी मारली. कडक उन्हाने पऱ्हे कोमेजली, तर रोवणी खोळंबली. रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी आणि गावाच्या समृद्धीसाठी मोहाडी तालुक्यातील पांजरा (बोरी) गावकऱ्यांनी परंपरेनुसार लोकवर्गणीतून ग्रामदेवतेचे पूजन केले. वाजतगाजत बाहुला - बाहुलीचे लग्न लावून महाप्रसादाचे वितरण केले.
रूसलेल्या निसर्गाला प्रसन्न करण्यासाठी करडी परिसरात वेगवगळे उपक्रम राबविण्याची जुनी परंपरा आजही कायम आहे. जुन्या पिढीतील लोकांबरोबर तरुणवर्गही मोठ्या उत्साहात सहभागी होताे. पावसाची कृपादृष्टी तसेच गावाची एकता आणि एकात्मता कायम राखण्याचा भाग म्हणूनही या उपक्रमाकडे पाहिले जाते. असाच एक उपक्रम मंगळवारी पांजरा गावात पार पडला. कोरोना महामारीचे संकट टळण्यासाठी उपाययोजनांसोबत लोकवर्गणीतून बाहुला - बाहुलीचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला. सायंकाळच्या सुमारास डफड्यांच्या तालात सामाजिक अंतर ठेवून ग्रामदेवतेचे पूजन करण्यात आले. गावात सुख समृद्धी नांदण्याची प्रार्थना करण्यात आली. बाहुला - बाहुलीची मिरवणूक काढत विनोद मेश्राम घरासमोरील पटांगणावर लग्न पार पडले. संपूर्ण ग्रामस्थांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
यासाठी सरपंच किरण शहारे, उपसरपंच गौरीशंकर राऊत, सदस्य प्रेमलता गाढवे, हर्षा तितिरमारे, सचिन बडगे, रंजीत मेश्राम, सतीश मेश्राम, संतोष भोयर, सियाराम पचघरे, कृष्णकांत गाढवे, मेश्राम, चंद्रकला मेश्राम, माधुरी मेश्राम, सरिता मेश्राम, ईश्वर शेंडे, प्रवीण मेश्राम, संतकला मेश्राम, कला मेश्राम, संगीता मेश्राम, पंचम बागडे, शिवा राऊत व गावकऱ्यांनी सहकार्य केले.
पांजरा गावात दरवर्षी बाहुला - बाहुलीच्या लग्नाची परंपरा जोपासली जाते. यावर्षी कोरोना महामारीतील भीतीचे संकट टाळण्यासाठी गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशातच पावसाने दडी मारल्याने वरूण देवतेला प्रसन्न करण्यासाठी व गावाच्या सुख समृद्धीसाठी या उपक्रमाचे आयोजन केले.
- गौरीशंकर राऊत, उपसरपंच, पांजरा (बोरी)
070721\img-20210706-wa0115.jpg~070721\img-20210706-wa0111.jpg~070721\img-20210706-wa0114.jpg
कोरोना संकट, रुसलेला पाऊस व सुखसमृद्धीसाठी ग्रामदेवतेचे पूजन~कोरोना संकट, रुसलेला पाऊस व सुखसमृद्धीसाठी ग्रामदेवतेचे पूजन~कोरोना संकट, रुसलेला पाऊस व सुखसमृद्धीसाठी ग्रामदेवतेचे पूजन