रेल्वे ट्रॅकमुळे उड्डाण पुलाचे बांधकाम आले वांद्यात ?
By Admin | Updated: December 6, 2014 22:41 IST2014-12-06T22:41:09+5:302014-12-06T22:41:09+5:30
युनिव्हर्सल कारखान्याच्या रेल्वे ट्रॅकमुळे झालेल्या अडचणीमुळे तुमसररोड रेल्वे क्रॉसिंग ५३२ वर बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे बांधकाम तूर्तास थांबविण्यात आले आहे. या उड्डाण पुलाचे काही कॉलम

रेल्वे ट्रॅकमुळे उड्डाण पुलाचे बांधकाम आले वांद्यात ?
तुमसर : युनिव्हर्सल कारखान्याच्या रेल्वे ट्रॅकमुळे झालेल्या अडचणीमुळे तुमसररोड रेल्वे क्रॉसिंग ५३२ वर बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे बांधकाम तूर्तास थांबविण्यात आले आहे. या उड्डाण पुलाचे काही कॉलम या टॅ्रकवर येत आहेत. नकाशा तयार करताना ट्रॅक कसा लक्षात आले नाही, याची चाचपणी सुरू आहे.
मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्ग तथा तुमसर-रामटेक-गोंदिया राज्य मार्गावरील तुमसर रोड रेल्वे स्थानकाजवळ थ्री कॅबीन ५३२ वर उड्डाण पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. मागील १५ वर्षापासून येथे उड्डाण पुलाची मागणी होत आहे. केंद्र व राज्य शासन येथे उड्डाण पूल तयार करण्याकरिता संमती दिली. ४३ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या पुल बांधकामाचा खर्च ६० टक्के राज्य शासन व ४० टक्के केंद्र शासन करणार आहे. टॅ्रकवरील उड्डाण पुलाचे बांधकाम रेल्वे तर दोन्ही अॅप्रोच रस्ता राज्य शासन तयार करणार आहे.
केंद्र (रेल्वे) व राज्य शासनाचे वरिष्ठ स्थापत्य अभियंत्याच्या अनेकदा संयुक्त बैठकी झाल्या. नकाशाला विविध मंजुरी घेतल्या. रेल्वेच्या अखत्यारातील मुख्य तांत्रिक अडचण युनिव्हर्सल कारखान्याच्या रेल्वे टॅ्रकमुळे निर्माण झाली. प्रत्यक्ष बांधकामाच्या अंतिम सर्वेक्षणाकरिता रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तथा स्थापत्य अभियंते २० दिवसापूर्वी येऊन गेले. त्यांनी युनिव्हर्सल फेरोचे रेल्वे ट्रॅक काढण्याचा आदेश दिला होता. त्याला युनिव्हर्सल व्यवस्थापनाने विरोध केला. हा रेल्वे ट्रॅक निरुपयोगी नाही. रेल्वेला दरवर्षी नियमाप्रमाणे आम्ही महसूल देतो. हा आमचा खासगी ट्रॅक आहे. हा ट्रॅक सुमारे २० ते २५ वर्षापूर्वी रेल्वेच्या परवानगीनेच टाकण्यात आला होता, याची माहिती रेल्वे मंत्रालयाला देण्यात आल्याचे सांगितले.
युनिव्हर्सलच्या या भूमिकेनंतर रेल्वेचे अधिकारी आल्यापावली माघारी फिरले. रेल्वेने आपल्या हद्दीतील कॅबीनजवळील दुसरे ट्रॅक येथे काढले आहे. रेल्वेने उड्डाण पुलाच्या नकाशाला मंजुरी देताना हा ट्रॅक अडचणीचा ठरेल हे कसे लक्षात आले नाही. हा मुख्य प्रश्न उपस्थित झाला आहे.
एरव्ही नियमावर बोट ठेवणारे रेल्वे प्रशासन यावेळी अनभिज्ञ कसे राहिले? पुन्हा नवीन नकाशा करुन मंजुरीचा ससेजिरा लागेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात रेल्वेचे अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत. (तालुका प्रतिनिधी)