सुंदरटोला जंगलात चितळाची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST2020-02-11T05:00:00+5:302020-02-11T05:00:17+5:30
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात सुंदरटोला जंगलात चितळाची शिकार झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांना मिळाली. त्यावरुन त्यांनी चौकशी सुरु केली असता आष्टी गावात या हरणाचे मांस शिजविले जात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर वनविभागाच्या पथकाने धाड मारली.

सुंदरटोला जंगलात चितळाची शिकार
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनारा : तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत सुंदरटोला जंगलात चितळाची शिकार करुन त्याच्या मांसावर ताव मारणाऱ्या पाच जणांना वनविभागाने सोमवारी अटक केली. त्यांच्याजवळून शिजविलेले मांस जप्त करण्यात आले. मात्र मुख्य शिकारी पसार होण्यास यशस्वी झाला.
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात सुंदरटोला जंगलात चितळाची शिकार झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांना मिळाली. त्यावरुन त्यांनी चौकशी सुरु केली असता आष्टी गावात या हरणाचे मांस शिजविले जात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर वनविभागाच्या पथकाने धाड मारली. त्यावेळी संशयीत आरोपी योगेश शंकर शेंडे (३३), योगेश नामदेव गौपाले (२७), गणेश घनश्याम गौपाले (४५) सर्व रा. आष्टी, संजय श्रीराम पुष्पतोडे (३८) रा. चिखला, ताराचंद सुजन कुंभारे (५२) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळून शिजविलेले चितळाचे मांस जप्त करण्यात आले. सदर मांस प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य शिकारी पसार असल्याची माहिती आहे. त्याचा शोध वनविभाग घेत आहे. गतवर्षी वाघाच्या शिकारीपासून वनविभागाची नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रावर करडी नजर आहे. गावागावांत खबरी असून त्यांच्या माहितीच्या आधारावर कारवाई केली जाते. त्यामुळे शिकारीवर आळा बसल्याचे सांगण्यात आले.