मुलाखतीच्या तंत्र कौशल्यातून विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:22 IST2018-11-04T21:21:53+5:302018-11-04T21:22:12+5:30
उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मा जोतिबा फुले हायस्कूल मोहगाव येथे विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसीत व्हावी या उद्देशाने मुलाखत तंत्राच्या माध्यमातून दत्तक विद्यार्थी उपक्रम राबविला गेला. या उपक्रमातून सात विद्यार्थिनींची दत्तक विद्यार्थी योजनेत सहभाग करून घेण्यात आला.

मुलाखतीच्या तंत्र कौशल्यातून विद्यार्थ्यांची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मा जोतिबा फुले हायस्कूल मोहगाव येथे विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसीत व्हावी या उद्देशाने मुलाखत तंत्राच्या माध्यमातून दत्तक विद्यार्थी उपक्रम राबविला गेला. या उपक्रमातून सात विद्यार्थिनींची दत्तक विद्यार्थी योजनेत सहभाग करून घेण्यात आला.
मागील चार वर्षापासून महात्मा जोतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी येथे दत्तक विद्यार्थी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत समाजातील व्यक्ती दत्तक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्चाचा भार उचलत असतात. विशेषत: इयत्ता दहावीसाठी ही योजना शाळेच्या माध्यमातून पूर्णत्वास नेली जाते. या सत्रात एकुण १५ विद्यार्थी दत्तक घेण्यात आले आहेत. यात मायाताई दिपटे, दिपाली बडवाईक, सत्यफुलताई लेंडे, नरेश ईश्वरकर, सुरेश मस्के, शंकर राठोड, जागेश्वर साठवणे, रवींद्र सपाटे, देवा चकोले, शोभा कोचे, हेमराज राऊत, हंसराज भडके, राजकुमार बांते, रिता बांते, दिगांबर कुकडे यांनी विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये स्मार्ट स्टुडंटस् अॅडाप्ट व्हेंचर २०१९-२० असे नामनिधान केलेली दत्तक योजना राबविण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना मुलाखत कौशल्याची जाणीव व्हावी. प्रत्यक्ष मुलाखतीचे तंत्र माहित व्हावे यासाठी मुलाखती द्वारे दत्तक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या योजनेत समाविष्ट होण्यासाठी २५ विद्यार्थ्यांनी नावाची नोंदणी केली होती. ३ नोव्हेंबर रोजी शाळेच्या डिजीटल क्लासरूममध्ये इन कॅमेरा मध्ये विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीत मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामान्य ज्ञान तसेच संभाषण कौशल्य वृद्धींगत करण्यासाठी आयत्या वेळी प्रश्न असे मुलाखतीचे स्वरुप होते. मुलाखतीनंतर विद्यार्थ्यांचा निकाल घोषीत करण्यात आला. यात जानवी लांबट, रुचिका भडके, पूजा खडके, प्रिया सेलोकर, अर्पिता आंबीलकर, यामीनी वैद्य, आरती ईश्वरकर या विद्यार्थ्यांनी गुणाक्रमात मुलाखतीत बाजी मारली. या सातवी विद्यार्थिनीची दत्तक विद्यार्थी योजनेत निवड करण्यात आली. यावेळी यश लेंडे, प्राप्ती बाभरे, रुचिका भडके, जानवी लांबट, अर्पिता आंबीलकर, आरती ईश्वरकर या विद्यार्थ्यांनी नाविण्यपूर्ण उपक्रमाविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच सहाय्यक शिक्षक धनराज वैद्य यांनी शाळेच्या स्थापनेच्या ३४ वर्षानंतर प्रथमच असा सृजनशील उपक्रम राबविण्यात आला. यामुळे विद्यार्थी मुलाखतीच्या तंत्राची प्राथमिक कौशल्य शाळेतूनच आत्मसात करू लागली असल्याचा आनंद व्यक्त केला. मुख्याध्यापक राजकुमार बांते यांनी दत्तक निवडीनंतर अटी व शर्ती सांगितल्या. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हंसराज भडके, शोभा कोचे, हेमराज राऊत, धनराज वैद्य यांनी परिक्षकाचे कार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गजानन वैद्य यांनी केले. मोहन वाघमारे, लिलाधर लेंडे, श्रीहरी पडोळे यांनी सहकार्य केले. स्मार्ट स्टुडंटस् अॅडॉप्ट व्हेंचर २०१९-२०२० या उपक्रमात मुलींनीच बाजी मारली. दत्तक विद्यार्थी योजनेत सात मुलींची निवड करण्यात आली. मुलांपेक्षा मुली एक पाऊल पुढे असल्याचे या उपक्रमातून दाखवून दिले आहे.