शुल्क न दिल्याने चिमुकल्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:35 IST2021-01-23T04:35:58+5:302021-01-23T04:35:58+5:30
कोरोना संक्रमण काळात मागील नऊ महिन्यांपासून शाळा कायम बंद आहेत; परंतु सदर शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवले होते. काही ...

शुल्क न दिल्याने चिमुकल्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद
कोरोना संक्रमण काळात मागील नऊ महिन्यांपासून शाळा कायम बंद आहेत; परंतु सदर शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवले होते. काही सीबीएससी शाळांनी शिक्षण शुल्क जमा करण्याचे निर्देश पालकांना दिले. ज्या पालकांनी शिक्षण शुल्क दिले नाही त्यांच्या पाल्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद केल्याची धक्कादायक माहिती आहे. संक्रमण काळात शाळा बंद असल्यानंतरही पूर्ण शिक्षण शुल्क वसुलीचा तगादा काही सीबीएससी शाळांनी लावला आहे. याला पालकांनी विरोध केला. ऑनलाईन शिक्षण दिले असल्याने किमान अर्धे शिक्षण शुल्क द्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. शिक्षण हक्क कायदा प्रभावीपणे अमलात आला असताना चिमुकल्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करणे हा नियम बाह्य आहे याच्या विसर संबंधित शाळांना पडलेला दिसतो. कोरोना संक्रमण काळात अनेक पालकांचा रोजगार गेला. नोकरीसुद्धा धोक्यात आली. काहींना अर्धे पगारावर नोकरी करावी लागत आहे. त्या कारणामुळे हजारो रुपयांचे शिक्षण शुल्क कसे द्यावे, असा प्रश्न पालकांना पडलेला आहे. शाळांनी शिक्षण शुल्क वसूल करण्याकरिता ऑनलाईन परीक्षा घेतल्या त्यांची उत्तरपत्रिका शाळेत नेऊन दिल्यावर शाळा प्रशासनाने शिक्षण शुल्क भरा व त्यानंतरच उत्तरपत्रिका जमा कराव्यात, असा आदेश दिला. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. शाळा बंद असताना पूर्ण शिक्षण शुल्क कसे घेतले जात आहे याची चौकशी शिक्षण विभागाने करण्याची मागणी पालकांनी केली आहे.