विमा कंपनीला चपराक
By Admin | Updated: February 27, 2015 00:26 IST2015-02-27T00:26:25+5:302015-02-27T00:26:25+5:30
अपघातग्रस्त जीप गाडीच्या मालकला नॅशनल इंशुरन्स कंपनी शाखा भंडारा व नागपूरच्या अधिकाऱ्यांनी विमा दाव्यासह २ लाख ४५ हजार रुपये व्याजासकट परत करावी,

विमा कंपनीला चपराक
भंडारा : अपघातग्रस्त जीप गाडीच्या मालकला नॅशनल इंशुरन्स कंपनी शाखा भंडारा व नागपूरच्या अधिकाऱ्यांनी विमा दाव्यासह २ लाख ४५ हजार रुपये व्याजासकट परत करावी, असा आदेश येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने पारीत केला.
सविता किसनलाल फुलसूंगे रा. बाबा मस्तानशहा वॉर्ड, भंडारा यांनी जीप क्र. एम.एच.३६- ०९७७ विकत घेतली होती. या वाहनाचा विमा नॅशनल इंशुरन्स कंपनी शाखा भंडारा येथे काढला. दरम्यान या वाहनाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला होता. अपघातात वाहनाचा चुराडा झाला. भंडारा येथील नॅशनल इंशुरन्स कंपनीने वाहन मालक सविता फुलसूंगे यांना विम्यापोटी ३ लाख ८९ हजार रुपये दिले.
इंशुरन्स कंपनीने विमा काढतेवेळी असलेली ६ लक्ष रुपये विम्याच्या किंमतीमधून ३ लाख ८९ हजार रुपये वजा करुन उर्वरित २ लक्ष १० हजार रुपये दिले नाही.
उर्वरित विम्याची मागणी करुनही रक्कम मिळाली नाही. रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसून येताच सविता फुलसूंगे यांनी ग्राहक मंचकडे धाव घेतली.
दोन्ही पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद, कागदपत्रांच्या तपासाअंती मंचने नॅशनल इंशुरन्स कंपनी शाखा भंडारा व नागपूरच्या अधिकाऱ्यांनी जीपगाडीच्या शिल्लक असलेल्या भंगारपोटी दोन लाख १० हजार रुपये व्याजासह ३ फेब्रुवारी २०१४ पासून रक्कम देतपर्यत परत करावी, वाहन मालकाला झालेल्या त्रासापोटी २५ हजार रुपये, तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार रुपये अदा करावी, असा आदेश पारीत केला.
याप्रकरणात वाहन मालकाकडून अॅड. के. एस. भुरे यांनी युक्तीवाद केला. (नगर प्रतिनिधी)