प्राथमिक शाळांमध्ये पुन्हा होणार चावडी वाचन
By Admin | Updated: September 14, 2014 23:53 IST2014-09-14T23:53:50+5:302014-09-14T23:53:50+5:30
प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे उचित साध्य करण्यासाठी सर्व स्तरावरून सर्वकष व सातत्यपूर्ण तेवढेच परिणामकारक संनियंत्रण व सक्रिय सहभाग आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांस

प्राथमिक शाळांमध्ये पुन्हा होणार चावडी वाचन
मोहाडी : प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे उचित साध्य करण्यासाठी सर्व स्तरावरून सर्वकष व सातत्यपूर्ण तेवढेच परिणामकारक संनियंत्रण व सक्रिय सहभाग आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांस कौशल्ये सादर करण्याची संधी मिळावी म्हणून राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये पुन्हा चावडी वाचनाची अंमलबजावणी करावी यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने भारत सरकारच्या निर्देशानुसार पत्र काढले आहे.
राज्याचा चावडी वाचन हा कार्यक्रम भारत सरकारच्या पातळीवरही उल्लेखनीय ठरला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी विचारात घेऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया प्रभावी करता येईल. चावडी वाचन कार्यक्रम २०१३-१४ पासून सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार सन २०१४-१५ मध्ये ही चावडी वाचन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची कौशल्य बघण्याची, अध्ययन - अध्यापनात सुधारणा करण् यास वाव मिळणार आहे. पालकांना आपल्या मुलाची प्रगती कुठपर्यंत पोहचली आहे याचे प्रत्यक्षात बघण्याची सोय चावडी वाचनाने मिळणार आहे.चावडी वाचन आॅक्टोबर, डिसेंबर, फेब्रुवारी महिन्याच्या तीन टप्प्यात घेण्यात येणार आहे. चावडी वाचन दुसरा अथवा चौथा शनिवार यापैकी एक दिवस सकाळी ८ ते ११ या वेळात पालक व समाजासमोर प्रत्यक्ष घेण्यात यावा. चावडी वाचन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होईल याची काळजी मुख्याध्यापकांना घ्यायची आहे. चावडी वाचण्याच्या वातावरण निर्मितीसाठी बालस्नेही कृती घेण्याच्या सूचना आहेत. सहज, आनंददायी, अनौपचारिक वातावरणात चावडी वाचन घेण्यात याव्या. चावडी वाचनाचा कार्यक्रम तीन दिवस अगोदर पालकांना व समाजाला माहित करण्यात यावा, यात महत्वाचा भाग असा की, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, पंचायत समिती स्तरावरील सर्व यंत्रणा, लोकप्रतिनिधी समाजातील शिक्षण प्रेमी, शिक्षणतज्ज्ञ, युवक, समाजसेवक, शिक्षक पालक, माता पालक, संघाचे सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व इतर ग्रामस्थांचा सहभाग करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे. तसेच स्थानिक प्राधिकरण पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व घटकांनाही चावडी वाचनात सहभागी करून घ्यायचे आहे. शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, निरंतर, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी निवडक शाळांमधील चावडी वाचनामध्ये सहभागी व्हायचे आहे. चावडी वाचनासाठी पाठ्य पुस्तकांशिवाय विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य, अध्ययन कार्ड, ग्रंथालयातील पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिक उपयोगाच्या सूचना आहेत. (तालुका प्रतिनिधी)