लाखांदूर : एका ट्रकमध्ये जनावरांना कोंबून वाहतूक करण्याचा प्रकार लाखांदूर तालुक्यातील बाेरगाव (मानेगाव) येथे पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस अला. ३२ जनावरांची सुटका करण्यात आली असून दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सुरेंद्र मोरेश्वर जनबंधू (४०) रा. पिलांद्री ता. पवनी असे ट्रक चालक तर ज्योती ब्राम्हणकर (४०) रा. बोरगाव असे जनावरांची वाहतूक करणाऱ्यांची नावे आहेत. बोरगाव येथील ज्योती ब्राम्हणकर यांच्या घराच्या आवारातून ३२ गोवंशीय जनावरे ट्रकमध्ये निर्दयतेने व क्रूरतेने कोंबून नेली जात असल्याची गुप्त माहिती दिघोरी पोलिसांना देण्यात आली. यावेळी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश गावंडे व पोलीस पथक बोरगाव येथे पोहचले. ते ट्रक क्र. एम.एच. २६ ए.डी. ९०६४ मध्ये जनावरांना कोंबून अवैध वाहतूक करीत असल्याचे आढळून आले.
यावेळी पोलिसांनी जनावरांसह ट्रक ताब्यात घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.