दोन सावकारांविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे
By Admin | Updated: December 18, 2015 01:00 IST2015-12-18T01:00:30+5:302015-12-18T01:00:30+5:30
कर्जदारांना नमुना ८ च्या खोट्या पावत्या देवून त्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पवनी पोलीस ठाण्यात दोन तर अड्याळ पोलीस ठाण्यात चार सावकारांविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दोन सावकारांविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे
१२ गुन्ह्यांची नोंद : कारवाईकडे सर्वांचे लक्ष
पवनी : कर्जदारांना नमुना ८ च्या खोट्या पावत्या देवून त्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पवनी पोलीस ठाण्यात दोन तर अड्याळ पोलीस ठाण्यात चार सावकारांविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही पोलीस ठाण्यात आतापर्यंत १२ सावकारांविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या सावकारांनी कर्जदारांना महाराष्ट्र गावकरी अधिनियम मधील नमुना ८ च्या खोट्या पावत्या देवून त्यांची फसवणूक केली. या खोट्या पावत्या या सावकारांनी खऱ्या म्हणून वापरल्या. तसेच या सावकारांनी या संबंधी महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम २४ अनुसार संबंधित रजीस्टरला याची नोंद न घेतल्याने शासनाचा महसूल बुडविला. या संबंधाने अनेक कर्जदारांनी तालुका सहायक निबंधक कार्यालयाकडे तक्रारी दिल्या होत्या. या तक्रारीची गंभीर दखल घेवून चौकशी करण्यात आली.
या चौकशीत अनेक गंभीर अनियमीतता आढळून आल्याने पोलीस स्टेशनमध्ये या सावकारांविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आल्या. या तक्रारीच्या आधारे भादंवि ४२०, ४६८, ४७१ सहकलम २४, ४३ महा. सावकारी अधिनियम अंतर्गत पवनी पोलीस स्टेशनमध्ये पवनी येथील सावकार कृष्णअवतार रामकरण कलंगी विरूद्ध अप क्रं. १३८/१५ अन्वये व प्रकाश केवळराम चित्रीव विरूद्ध १३९/१५ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत पवनी पोलीस ठाण्यात ८ सावकारांविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अशाच प्रकारे अड्याळ पोलीस ठाण्यात उषा लांबट रा. कोंढा (कोसरा), गोपाल लांबट रा. अड्याळ सदाशिव मस्के रा. कोंढा व महादेव धाबेकर रा. पालोरा चौ. या चार सावकाराविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत एकूण १२ सावकाराविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील चौकशी पवनी व अड्याळ पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)