भंडारा शहराचा विकास आराखडा तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:13 IST2018-08-07T22:13:02+5:302018-08-07T22:13:29+5:30
गेल्या अनेक वर्षापासून भंडारा शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला नाही. शहराची वाढती लोकसंख्या व नागरिकांच्या गरजा लक्षात घेता भंडारा शहराचा सर्वकष आराखडा तयार करणे आवश्यक असून नगर पालिकेने पुढील ३० वर्षाचा डोळयासमोर ठेवून भंडारा शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

भंडारा शहराचा विकास आराखडा तयार करा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गेल्या अनेक वर्षापासून भंडारा शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला नाही. शहराची वाढती लोकसंख्या व नागरिकांच्या गरजा लक्षात घेता भंडारा शहराचा सर्वकष आराखडा तयार करणे आवश्यक असून नगर पालिकेने पुढील ३० वर्षाचा डोळयासमोर ठेवून भंडारा शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
नगर पालिकेच्या विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार चरण वाघमारे, बाळा काशिवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, तुमसर नगराध्यक्ष प्रदीप पडाळे, उपनगराध्यक्ष आशु गोंडाणे, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, नगरसेवक व विभाग प्रमुख उपस्थित होते.
भंडारा शहरासाठी शासनाने ५६ कोटी रुपये किंमतीची पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. ही योजना पूर्णत्वास येण्यास दोन वर्षाचा कालावधी लागू शकतो. या कालावधीत भंडारा शहरवासियांना पुरेसे पिण्याचे शुध्द पाणी मिळावे यासाठी नगर परिषदेने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
प्रत्येक प्रभागात एक आरो प्लांट बसविण्याची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेवून चर्चा करावी, असे ते म्हणाले. दिवाळीच्या आत किमान २० आरो प्लाँट बसविण्याचे नियोजन करावे. नगरपालिकेच्या विविध विभागाचा अखर्चित निधी ५२ कोटी रुपयांच्या जवळपास असून अखर्चित निधीची माहिती कारणासह सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नगर पालिकेची बैठक दर महिन्याला घेवून लेखा विभागाने अखर्चित निधी विकास कामाबाबत नगरसेवकांनी माहिती देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणाऱ्या विकास कामांचे नियोजन करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात यावेत, असे ते म्हणाले. विकास कामाचे जिओ टॅगिग, छायाचित्र व चित्रिकरण अनिवार्य असून या बाबतची माहिती वेळोवेळी नगरपरिषद सदस्यांना देण्याची सूचना त्यांनी केली.
जिल्हा नियोजनचा निधी दिवाळी पूर्वी खर्च करण्यात यावा अन्यथा निधी परत घेवू असेही पालकमंत्री यांनी सांगितले. नगर परिषदेचा निधी वेळेत खर्च होणे आवश्यक असून जो विभाग निधी परत करेल त्या विभागाच्या प्रमुखांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश त्यांनी दिले. पहिले निधी खर्च करा व नंतरच निधी मिळवा, असे ते म्हणाले.
नगर पालिकेच्या बजेटची एक प्रत नगर सेवकांना देण्यात यावी असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, शहरातील गरजू व्यक्तींना घरकूल देण्याबाबत प्रधानमंत्री आवास योजना प्राधान्याने राबविण्यात यावी. यासाठी नगर पालिकेने म्हाडाला प्रस्ताव पाठवावा, असे त्यांनी सांगितले. घरकूल योजनेसाठी लागणाºया आवश्यक परवानग्या घेतांनाच जागेचा अभाव असल्यास बहुमजली इमारतीचा आराखडा तयार करावा. नगर पालिकेच्या विकास कामाचे आराखडे तपासण्यासाठी उपजिल्हाधिकारी स्तरीय अधिकारी व नगर रचनाकार यांची नियुक्ती करावी, असे त्यांनी सूचविले.
दलित वस्ती योजनेत सिमेंट रस्ते न घेता मुलभूत सुविधेची कामे करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. घनकचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांच्या तक्रारी असून कचरा व्यवस्थापन योग्य रितीने करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.