जिल्ह्यात ब्रिटिशकालीन इमारती सुस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 05:00 AM2020-08-27T05:00:00+5:302020-08-27T05:00:49+5:30

ब्रिटिश देश सोडून गेले असले तरीही त्यांनी बांधलेल्या इमारती, पूल, कारागृह, शासकीय निवासस्थाने, नगरभवन व अन्य वास्तू आजही त्यांची साक्ष देत उभ्या आहेत. साकव पद्धतीने बांधलेले लहान पूलही ब्रिटिशकालीन मजबूत बांधकाम शैलीचे आहेत. ब्रिटिशकालीन वास्तूंमध्ये लाखनी शहरातील राष्ट्रीय महामार्गावर स्थित विश्रामगृह आजही दिमाखात उभे आहे.

British era buildings in good condition in the district | जिल्ह्यात ब्रिटिशकालीन इमारती सुस्थितीत

जिल्ह्यात ब्रिटिशकालीन इमारती सुस्थितीत

Next
ठळक मुद्दे३३ इमारतींचा समावेश : ऐतिहासिक व दर्जेदार बांधकामाचा पुरावाच

इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारताला स्वातंत्र्य मिळून सात दशकांपेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतरही जिल्ह्यात ब्रिटिशांनी बांधलेल्या इमारती, निवासस्थाने, पूल दिमाखात उभे आहेत. अशा ब्रिटिशकालीन इमारतींची संख्या ३३ असून आजही त्या सुस्थितीत आणि वापरात आहेत. या इमारतींची डागडुजी आवश्यक असली तरी देखणे बांधकाम व दर्जेदारपणा सर्वांनाच आकर्षित करीत आहे.
ब्रिटिश देश सोडून गेले असले तरीही त्यांनी बांधलेल्या इमारती, पूल, कारागृह, शासकीय निवासस्थाने, नगरभवन व अन्य वास्तू आजही त्यांची साक्ष देत उभ्या आहेत. साकव पद्धतीने बांधलेले लहान पूलही ब्रिटिशकालीन मजबूत बांधकाम शैलीचे आहेत. ब्रिटिशकालीन वास्तूंमध्ये लाखनी शहरातील राष्ट्रीय महामार्गावर स्थित विश्रामगृह आजही दिमाखात उभे आहे.
साकोली येथील तहसील कार्यालयही ब्रिटीशकालीन आहे. तेथे विद्यमान स्थितीत सेतू केंद्र, कोषागार कार्यालय व तहसील प्रशासनाचे अन्न व पुरवठा विभाग कार्यालय आहे. लाखांदूर तालुक्यात फक्त एक ब्रिटिशकालीन बाहुली विहिरीचे बांधकाम आढळून येते. मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील पोलीस स्टेशन, बोथली गावाजवळ नाल्यावर बांधलेला पूल आहे. तर जिल्ह्यात वैनगंगा नदीवर माडगी येथे रेल्वेचा पूल असून आजही त्यावरून वाहतूक सुरू आहे.

जिल्ह्यात दोन पूल
तुमसर तालुक्यात वैनगंगा नदी व ब्रिटिशांनी बांधलेला भव्य रेल्वे पूल असून तुमसर नगरपरिषदेची इमारतही ब्रिटिशकालीन आहे. भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हाधिकारी कार्यालय, कांजी हाऊस, जिल्हा न्यायालयाची जुनी इमारत, लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची इमारतीसह काही निवासस्थाने ब्रिटिशांनी बांधले.

नुतनीकरणाची आवश्यकता
जिल्ह्यात असलेली ब्रिटिशकालीन इमारती चांगल्या स्थितीत असले तरी काही डागडुजी करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. वापरात असले तरी काळानुरूप देखभाल व दुरुस्तीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येत असतो. याची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. सदर इमारतींमध्ये वापरण्यात आलेल्या बांधकाम साहित्यांचा अन्यत्र कुठेही वापर केला गेला नसल्याचे सांगण्यात येते. तसेच ब्रिटिश सरकारकडून जिल्हा प्रशासनाकडे कुठलाही पत्रव्यवहारही झालेला नाही. जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाऱ्या या इमारतींची नियमित देखभाल व दुरूस्ती करणे आवश्यक आहे.

बांधकामाची ऐतिहासिक साक्ष
 जिल्ह्यात असलेल्या ब्रिटिशकालीन इमारती, पूल आदी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व काही स्थानिक प्रशासनाच्या अखत्यारीत येतात. शासकीय विभागातील १२ विभागांच्या ३३ इमारती आजही वापरात आहेत. या इमारतींचे बांधकाम १९०३ ते १९४७ या कालावधीत झाले आहे. इमारतींची अवस्था ९९ टक्के उत्तम असून कर्मचारी आजही कामकाज करीत आहेत. समाधानकारक स्थितीत असलेल्या या इमारती बांधकामाची ऐतिहासिक साक्ष देताहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळातील बांधकाम
जिल्ह्यात ब्रिटिशकालीन इमारतींची संख्या ३३ आहे. त्यातही भंडारा शहरातील शास्त्री चौक परिसरात असलेली लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची विशाल वास्तू आजही दिमाखदारपणे उभी आहे. यात काळानुरूप देखभाल व दुरुस्ती करण्यात आली आहे. यात शासकीय कार्यालय व निवासस्थाने यांचे बांधकाम स्वातंत्र्यपूर्व काळात झाल्याचे दिसून येते. या इमारतीची रंगरंगोटी कुणाच्याही नजरेत भरते. अनेक विद्यार्थ्यांना या शाळेने घडविले असून अनेक आठवणींची साक्ष देत इमारत उभी आहे.
 

Web Title: British era buildings in good condition in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा