नियोजन भवनाचे भूमिपूजन हा सुवर्णकांचन योग
By Admin | Updated: November 7, 2015 00:28 IST2015-11-07T00:28:02+5:302015-11-07T00:28:02+5:30
जिल्हा मुख्यालयी नियोजन भवनाची नितांत गरज होती. पालकमंत्री म्हणून नियोजन भवनाचे भूमिपूजन माझ्या हस्ते होणे हा सुवर्णकांचन योगच आहे.

नियोजन भवनाचे भूमिपूजन हा सुवर्णकांचन योग
भूमिपूजन समारंभ : पालकमंत्र्यांचे प्रतिपादन
भंडारा : जिल्हा मुख्यालयी नियोजन भवनाची नितांत गरज होती. पालकमंत्री म्हणून नियोजन भवनाचे भूमिपूजन माझ्या हस्ते होणे हा सुवर्णकांचन योगच आहे. या भवनामुळे जिल्हास्तरावर होणाऱ्या बैठकांसाठी व्यासपीठ मिळणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. दीपक सांवत यांनी केले.
नियोजन भवन भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आमदार चरण वाघमारे, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, नगराध्यक्ष बाबुराव बागडे, जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके उपस्थित होते.
याचवेळी राज्य शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त तयार करण्यात आलेल्या घडी पत्रिकेचे प्रकाशन, विविध योजनांवर आधारित चित्ररथाचे हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. राज्य शासनाने वर्षभरात नवनविन योजना साकारण्याचा प्रयत्न केला. डॉ.अब्दुल कलाम अमृत योजना ही आदिवासी क्षेत्रातील गर्भवती महिला, स्तनदा मातांसाठी राबविण्यात आली आहे. त्यामुळे जन्माला येणाऱ्या सुदृढ बालकांचे प्रमाण वाढविण्यासाठी त्यात महिलांना प्रसुतीपूर्वीचे तीन महिने आणि प्रसुतीनंतर तीन महिने असा सहा महिन्यासाठी एक वेळेचा चौकस आहार देण्यात येतो. सावकार कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील ९९४ लोकांना त्याचा फायदा झाला आहे. सावकारी पाशातून मुक्त झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. जिल्ह्यत १,२०० व्यक्तीचे कर्जमुक्तीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले आहे. त्यामध्ये कायद्यात शिथीलता आणून त्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. शासनाने वर्षभरात सुरु केलेल्या योजना व शासन निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहचाव्यात या हेतूने जिल्हा माहिती कार्यालयातर्फे घडीपत्रिका तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना, कृषि सौरपंप, महाराजस्व अभियानांतर्गत दाखले वाटप, राजीव गांधी जीवनदायी योजना या योजनांचा उल्लेख आहे. त्याचा नागरिकांना लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयातर्फे शासनाच्या उपक्रमावर आधारित चित्ररथ तयार करण्यात आला असून हा चित्ररथ सातही तालुक्यातील गावागावात फिरणार आहे. त्यामुळे शासन आपल्या दारी या योजनेनुसार गावात शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल.
यावेळी आ.चरण वाघमारे यांनी जिल्ह्यातील समस्यांबाबत पालकमंत्र्यांना अवगत केले. राज्यात सावकारी कर्जमुक्ती योजनेत जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. सावकारी पाशातून शेतकरी कर्जमुक्त व्हावा, यासाठी शासनाने सावकारी मुक्तीचा घेतलेला निर्णय लोकहितकारी आहे. यावेळी सावकारी कर्जमुक्ती योजनेंतर्गत धोंडू सहारे, भारत मेश्राम, सेवक ढबाले, प्रकाश डोंगरे, मंगेश डोंगरे, ग्यानीराम मस्के, कैलास वासनिक, गौरीशंकर रहांगडाले, अनूरथ रवींद्र बुराडे, सदाराम सहारे यांना पालकमंत्र्याच्या हस्ते सावकारी कर्जमुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी डाळीचे स्वस्त दरात पालकमंत्र्याच्या हस्ते वाटप करण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)