बीपीएल कार्डधारक सहा महिन्यांपासून साखरेपासून वंचित
By Admin | Updated: July 19, 2014 23:47 IST2014-07-19T23:47:26+5:302014-07-19T23:47:26+5:30
मागील सहा महिन्यापासून बीपीएलच्या कार्डधारकांना पवनी तालुक्यात एकाही गावात साखर मिळाली नाही. यासाठी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. दुसऱ्या तालुक्यात दरमहिन्याला साखर मिळते.

बीपीएल कार्डधारक सहा महिन्यांपासून साखरेपासून वंचित
कोंढा कोसरा : मागील सहा महिन्यापासून बीपीएलच्या कार्डधारकांना पवनी तालुक्यात एकाही गावात साखर मिळाली नाही. यासाठी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. दुसऱ्या तालुक्यात दरमहिन्याला साखर मिळते. पण येथे मिळत नसल्याने एकाही लोकप्रतिनिधीच्या लक्षात आले नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
साखरेचे भाव गगनाला भिडले आहे. पुढील महिन्यात सणासुदीचे दिवस येत आहेत. अशावेळी राशन दुकानातून साखर मिळाली पाहिजे अशी प्रत्येक बीपीएल कार्डधारकांची अपेक्षा आहे. सहा महिन्यापासून पवनी तालुक्यात साखर न येण्याचे कारण क्षुल्लक आहे. पण त्याकडे तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे जाणीवर्पूक दुर्लक्ष होत आहे. तालुक्यासाठी साखर आणणारी एजन्सी तालुका शेतकी खरेदी विक्री समिती, पवनी ही आहे. या समितीचे कमीशन जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले नाही. म्हणून त्यांनी राशन दुकानदारांचा साखर कोटा उचलणे बंद केले.
वाढत्या महागाईमुळे ग्राहकांना रेशन दुकानाचे तांदूळ, गहू, साखरेची उचल करावी लागते. सहा महिन्यापासून साखरेची उचल शेतकी खरेदी विक्री समितीने करणे बंद केले आहे. त्याचा फटका बीपीएलच्या कार्डधारकांना बसत आहे. सध्या रेशन दुकानातून गहू २० किलो व तांदूळ १५ किलो असे ३५ किलो धान्याची उचल कार्डधारक करीत आहेत. पण पुढील महिन्यात राखी, नागपंचमी, जन्माष्टमी, पोळा यासारखे सण समोर आहेत. या सणाच्या काळात प्रत्येक घरी गोड पदार्थ बनविले जात असते. अशावेळी राशन दुकानातून साखर मिळणे आवश्यक आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन तालुका शेतकी खरेदी विक्री समिती पवनी यांची अडचण काय ते समजून घ्यावे त्याची कमीशन रक्कम नियमित काढल्यास बीपीएल कार्डधारकांना साखर मिळू शकते. यासाठी कोणीतरी समोर येऊन पुढाकार घ्यावे अशी मागणी कार्डधारक करीत आहेत. (वार्ताहर)