भंडाऱ्यातील चारही नगर पालिकांमध्ये उपाध्यक्षपदांवर भाजपचाच ताबा; शिंदेसेना, काँग्रेसला किती जागा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 17:28 IST2026-01-17T17:27:14+5:302026-01-17T17:28:25+5:30
Bhandara : जिल्ह्यातील चारही नगर पालिकांमध्ये उपाध्यक्षपदावर भाजपने विजय मिळवून पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या सोबतच चारही नगर पालिकांमधील ११ स्वीकृत सदस्यांपैकी ७ जागांवरही विजय मिळविला आहे.

BJP controls the vice-president posts in all four municipalities in Bhandara; How many seats will Shinde Sena and Congress have?
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील चारही नगर पालिकांमध्ये उपाध्यक्षपदावर भाजपने विजय मिळवून पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या सोबतच चारही नगर पालिकांमधील ११ स्वीकृत सदस्यांपैकी ७ जागांवरही विजय मिळविला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने जिल्ह्यात वर्चस्व स्थापित केल्याचे दिसत आहे.
भंडारा नगर पालिकेमध्ये स्विकृत सदस्यांची चार पदे होते. त्यापैकी तीन जागा भाजपने मिळविल्या आहेत. तर, एक जागा शिंदेसेनेकडे गेली आहे. तुमसर नगर पालिकेमध्ये मोठ्या नाट्यमय घडामोडी झाल्या. येथे तीन जागांपैकी दोन जागा भाजपने मिळविल्या तर, एक जागा काँग्रेसकडे गेली आहे.
पवनीमध्ये दोन जागांपैकी एक जागा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील भाजपच्या पराभूत उमेदवार भावना भाजीपाले यांना मिळाली असून शिंदेसेनेला एक जागा मिळाली आहे. तर, साकोलीमध्ये दोन जागांपैकी प्रत्येकी एक जागा भाजप आणि काँग्रेसला मिळाली आहे.
नवनिर्वाचितांसह भाजपचा आनंदोत्सव
दरम्यान, विजयाच्या घोषणेनंतर आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भंडाऱ्यातील विश्रामगृहावर भाजपमधील चारही पालिकांमधील नवनिर्वाचित उपाध्यक्ष तसेच स्वीकृत सदस्यांच्या आणि आमदार परिणय फुके यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. परिणय फुके यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सर्व नवनिर्वाचितांचे अभिनंदन केले. मिठाई भरवून सर्वांचे तोंड गोड केले.
परिणय फुके पुन्हा ठरले विजयाचे शिल्पकार
आमदार अॅड. परिणय फुके यांचे राजकीय कसब या निवडणुकीतून पुन्हा दिसले आहे. चारही ठिकाणी उपाध्यक्षपदे मिळवून त्यांच्या नेतृत्वात भाजपने नवा अध्याय रचल्याचे म्हटले जात आहे. नगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पक्षाने सोपविलेल्या जबाबदारीतील यशानंतर हा दुसरा टप्पाही यशस्वी ठरल्याने पक्षवर्तुळामध्ये आनंद व्यक्त होत आहे. तुमसर नगर पालिकेमध्ये सुरूवातीपासूनच त्यांचे राजकीय कौशल्य पणाला लागले होते. भंडाऱ्यातील पेचही त्यांनी सोडविला.