जिल्ह्यातील बिडी उद्योग मोडकळीस!
By Admin | Updated: November 3, 2014 23:21 IST2014-11-03T23:21:34+5:302014-11-03T23:21:34+5:30
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख उद्योगांपैकी एक असलेला बिडी उद्योग पूर्णत: मोडकळीस आला असून, या व्यवसायात गुंतलेल्या हजारो बिडी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

जिल्ह्यातील बिडी उद्योग मोडकळीस!
भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख उद्योगांपैकी एक असलेला बिडी उद्योग पूर्णत: मोडकळीस आला असून, या व्यवसायात गुंतलेल्या हजारो बिडी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. नामांकित बिडी कंपन्यांनी त्यांचे जिल्ह्यातील कारखाने बंद केले असून, मजुरांसह कारखान्यातील कर्मचारी आणि कंत्राटदारांवरही आर्थिक संकट ओढवले आहे.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल पसरले असून, या जंगलातून तेंदूपत्ता मिळतो. तेंदूपत्ताची मुबलकता लक्षात घेऊ न या दोन्ही जिल्ह्यात बिडी उद्योग फोफावले. दोन्ही जिल्ह्यात सी.जे. पटेल अॅन्ड कंपनी, गोंदिया, मोहनलाल हरगोविंद दास (जलबपूर) आणि पी.के. पोरवाल कंपनी (कामठी) या तीन नामांकित कंपन्याचे बिडी कारखाने होते. बहुतेक सर्व तालुक्यांच्या ठिकाणी त्यांचे स्टॉक असायचे. गावागावात या कंपन्यांनी कंत्राटदार नियुक्त केले होते. मजुरांना तेंदुपाने, तंबाखू आणि सुताचा पुरवठा करायचा व मजुरांनी तयार केलेल्या बिड्या घेऊ न त्या कारखान्यात पुरवायच्या, असा हा उद्योग दोन्ही जिल्ह्याच्या शेकडो गावात पसरला होता. या मजुरांना एक हजार बिड्यांसाठी २५ ते ४० रू पयांपर्यंत मजूरी दिली जायची. मोठया कंपन्याचे बंदर बॅग, संजीव आणि असेच अनेक ब्रँन्ड होते. स्थानिक पातळीवरही गेंडा, टायगर, चिता या नावाने काही काही लघुउद्योगही उभे झाले होते. ग्रामीण भागातील बहुतेक कुटूंब बिड्या वळण्याच्या व्यवसायात असायचे. यातूनच त्या कुटूंबाचा आर्थिक गाडा रेटला जायचा. मात्र, गेल्या काही वर्षात बिडी उद्योग पूर्णत: मोडकळीस आला आहे.
पोरवाल, सी.जे. पटेल, सोहनलालसारख्या कंपन्यांनी त्यांचे कारखाने आणि स्टॉक बंद केले आहेत. परिणामी, कारखान्यात कार्यरत कर्मचारी, व्यवस्थापक आणि कंत्राटदारही रस्त्यावर आले आहेत. कारखानेच बंद झाल्याने हजारो मजुरांवरही आर्थिक संकट कोसळले आहे.
तेंदूपत्याच्या कमाईत नक्षलवाद्यांचा हिस्सा ?
तेंदूपत्ता हा बिडी व्यवसायातील महत्वाचा घटक आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तेंदूपत्ता मिळत असून, याच जिल्ह्याच्या जंगलव्याप्त भागात नक्षलवादी चळवळ फोफावली आहे. तेंदूपाने तोडणाऱ्या कामगारांनी मजुरी वाढविणे, तेंदू ठेकेदारांकडून खंडणी वसूल करणे, त्यांचे ट्रक जाळणे, प्रसंगी मारहाण करणे अशा मार्गाचा नक्षलवाद्यांनी अवलंब करणे सुरू केले आहे. नक्षल्यांची नाराजी ओढवून कोणत्याही तेंदूपत्ता ठेकेदार जंगलातून पाने गोळा करू शकत नाही किंवा वाहतूक करू शकत नाही. तेंदूपत्ताच्या व्यवसायातील कमाईतून बराचसा वाटा नक्षलवाद्यांना द्यावा लागत असल्याने कंत्राटदारांनीही तेंदूपत्याचे भाव वाढविले. परिणामी, बिडी कारखानदारांना चढ्या दरात तेंदूपत्ता विकत घ्यावा लागतो. इतके सारे करुनही बिड्यांना मागणी नसल्याने तसेच भाव मिळत नसल्याने या कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे.
मजुरांची फरपट
बिडी उद्योगावर अवकळा आल्याने आणि कंपन्यांतील उद्योग गुंडाळल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो मजुरांची अक्षरश: फरपट सुरु आहे.
बिड्या वळण्याशिवाय दुसरे काम जमत नसल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. बहुतेक मजूर आता रोजगार हमी योजना आणि अशाच मोलमजुरीच्या कामावर जात आहे. तेंदूपत्ताचे पुडे करणे, पाने कापणे, बिड्या वळणे, कट्टे किंवा चुंगळ््या तयार करणे, ही कामे बैठ्या स्वरुपाची असल्याने शेकडो मजुरांना मणक्याचे आजार जडले आहेत. शिवाय सातत्याने तंबाखूच्या संपर्कात असल्याने अनेक जण फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त आहे. बिडी मजुरांसाठी भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि भंडारा येथे कामगार खात्याचे रुग्णालय असले तरी, त्याचा कोणताही लाभ मजुरांना होत नाही.
पुर्वी बिड्या वळून कुटूंबाचा गाडा रेटणारे अनेक मजूर आता भीक मागताना दिसतात. बिडी उद्योग बंद पडल्यानंतर या मजुरांसाठी दुर्देवाने शासन अथवा राजकीय पुढाऱ्यांनी अन्य कोणतेही उद्योग उभारले नसल्याने एक मोठा वर्ग आज हलाखीचे जीवन जगतो आहे. (नगर प्रतिनिधी)