भुजबळांना अटक राजकीय सुडभावनेतून
By Admin | Updated: March 18, 2016 00:38 IST2016-03-18T00:38:57+5:302016-03-18T00:38:57+5:30
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना....

भुजबळांना अटक राजकीय सुडभावनेतून
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : समता परिषदेचा आरोप
भंडारा : महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना राजकीय सुडभावनेतून अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावरील आरोप बिनबुडाचे असून त्यांचा अटकेचा समता परिषदेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
या संदर्भात निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी स्वीकारले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष असलेले छगन भुजबळ हे ईडी कार्यालयात चौकशीकरिता गेले असता त्यांना तत्काळ अटक करण्यात आली. भुजबळ यांनी सुरुवातीपासूनच चौकशीला सहकार्य केले आहे. अशा स्थितीतही राजकीय सूड भावनेतून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकाराच्या समता परिषदेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.
सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे अटक करणे उचित नाही. असेही निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देताना समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष भेदे, कमलेश कनोजे, जि.प. च्या माजी सदस्य रुपलता जांभुळकर, शैलेश गजभिये, नितीन वानखेडे, लखन चवरे, नरेश भेदे, प्रशांत मिश्रा, सुहास बोरकर यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तथा समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)