भंडारा: नगर परिषदेच्या विविध विषय समिती सभापती निवडीसाठी शनिवारी विशेष सभा घेण्यात आली. विशेष म्हणजे, या सभेत निवडणूक न होता सर्व सभापतींची निवड बिनविरोध झाली. पाचपैकी तीन विषय समित्यांवर भाजपचे तर उर्वरित दोन समित्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एका सदस्याची सभापतीपदी निवड झाली आहे.
भंडारा नगरपरिषदेच्या उर्वरित वर्षभराचा कालावधीसाठी विषय समिती सभापतीची निवड करण्यात आली. नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी भुनेश्वरी मनोज बोरकर, महिला बालकल्याण सभापतीपदी साधना संतोष त्रिवेदी, स्वच्छता वैधक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी ज्योती हरिष मोगरे तर उपसभापती आशा हरिश्चंद्र उईके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिक्षण समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या अश्विनी नरेंद्र बुरडे, नियोजन आणि विकास समिती सभापतीपदी काँग्रेसचे शमीम शेख यांची वर्णी लागली आहे.
स्थायी समिती सदस्य म्हणून संजय कुंभलकर, आशू गोंडाने आणि विनयमोहन पशिने यांची वर्णी लागली आहे. पुढील काही दिवसांत उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. कार्यकाळ संपायला शेवटचे वर्ष असल्याने विकासकामांमध्ये अडथळे न येता ते सुरळीत पडावेत, या विकासाच्या दृष्टिकोनातून नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी पुढाकार घेत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केला. प्रत्येक पदाधिकाऱ्याने मिळालेल्या पदाकडे संधी म्हणून पाहत काम करावे, असे आवाहन करीत नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. सभेला पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड तर सहाय्यक पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी काम पाहिले.