वाळवंटातील बिऱ्हाड झाडीपट्टीत दाखल
By Admin | Updated: March 6, 2015 01:02 IST2015-03-06T01:02:21+5:302015-03-06T01:02:21+5:30
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न व पोटाची खळगी भरण्यासाठी वाळवंटातील उंटासह जनावरे घेऊन अनेक कुटुंब आपल्या बिऱ्हाडासह झाडीपट्टीत दाखल झाले आहेत.

वाळवंटातील बिऱ्हाड झाडीपट्टीत दाखल
भंडारा : जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न व पोटाची खळगी भरण्यासाठी वाळवंटातील उंटासह जनावरे घेऊन अनेक कुटुंब आपल्या बिऱ्हाडासह झाडीपट्टीत दाखल झाले आहेत.
आपल्या कुटुंबासोबत असलेल्या उंट व मेंढ्यांचा कळप सांभाळणे, त्यांच्या चारा व पाण्याची व्यवस्था करणे व यासोबतच पुंजी आपल्यासोबत नेणे हा उद्देश घेऊन कच्छमधील ही मंडळी येत आहे. ती अवाढव्य उंट व सोबत मेंढ्याचा कळप मुलाबाळांसह आलेल्या या माणसांना विचारले असता विदर्भाचा मोठेपणाच आपल्याला ग्रामीण भागाकडे आकर्षित करतो. जेव्हा पाण्याची कमतरता असायची तेव्हाच आम्ही या भागात आमच्या बिऱ्हाडाचे दस्तान मांडत होतो. त्यावेळी विहिरीत बादली टाकली तरी पाणी मिळत असे, आता मात्र ९५ टक्के विहिरीत बोअर असल्यामुळे वीज खंडित झाली तर पाण्यासाठी तळपणाऱ्या व्यक्तीलाही पाणी मिळत नाही. एवढी जीवघेणी पाण्याची समस्या आहे. निवळ चारा आणि आणि यासाठी राजस्थानी व कच्छ मधील बिऱ्हाड त्यांचेकडील जनावरांना शेतात बसवायचे तेव्हा यासाठी मोबदला घेतला जात असे. तसे ही परीस्थिती आज पुर्णपणे बदलली आहे. आज तर शेजारचा शेतकरी या बिऱ्हाडाला आपल्या शेतात येण्याला मज्जाव करीत आहे.
उंटासारख्या अवाढव्य प्राण्याला सोबत आणण्यात या राजस्थानी, बिऱ्हाडाचा एकच उद्देश असतो तो म्हणजे त्यांनी सोबत आणलेले राहणीमानाची साधने यात खाटांपासून तर उपजिविकेची साधनसामुग्री यांना वाहून नेण्यासाठी उंटाचा उपयोग केला जातो. यासोबत त्यांची कुत्री व घोडेही असतात. याठिकाणी हे आपले बस्तान मांडतात, त्याला ‘बेडा’ म्हणतात. बेड्यांचे संरक्षण करण्यासाठी कुत्र्यांचा उपयोग होतो. या लोकांचा ग्रामीण भागातील आगमनामुळे बाजारपेठेची उलाढाल वाढते. या बेड्यातील महिलाच बाजारपेठेतील खरेदी सांभाळतात. त्यामुळे सर्व दुकानदार यांचेकडे अपेक्षेने पाहतात. कारण त्यांची खरेदी हजारोंच्या घरात असते. (नगर प्रतिनिधी)