बळीराजा उघड्यावर...
By Admin | Updated: March 3, 2015 00:27 IST2015-03-03T00:27:23+5:302015-03-03T00:27:23+5:30
शनिवारी रात्री आलेल्या संततधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यात शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे

बळीराजा उघड्यावर...
गहू जमीनदोस्त : भंडारा, मोहाडी, साकोलीत अतिवृष्टी, आंब्याचा मोहर झडला, शेकडो क्विंटल शेत पाण्यात
भंडारा : शनिवारी रात्री आलेल्या संततधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यात शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. या पावसाने गव्हाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ओंंबीवरचा गहू या पावसामुळे अक्षरश: झोपला.
भंडारा जिल्ह्यात सरासरी ६० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. भंडारा, मोहाडी व साकोलीत अतिवृष्टी झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी होण्याचा कदाचित ही पहिलीच वेळ असावी. या पावसाने आंबा मोहर गळाला, हरभरा, तुरीच्या गंजा भिजल्या. अचानक पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या मागच्या संकटाची मालिका सुरूच असल्याने त्यांचे जनू कंबरडेच मोडले.
खरीप हंगामात निसर्गाने शेतकऱ्याला नागविले. त्यानंतर रब्बी पिकाची कशीबशी पेरणी केली. मात्र या हंगामातही दृष्टचक्राने शेतकऱ्यांचा पिच्छा सोडला नाही.
रब्बी हंगामाचे पिक जोमात असताना ते हातात आल्यानंतर किमान नशिब पलटेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र त्या अपेक्षेवर अवकाळी पावसाने पाणी फेरले. रविवारी दुपारनंतर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी हंगामातील कापणीला आलेला व डौलात उभा असलेला गहू पूर्णत: जमीनीवर लोळला.
कापणी झालेल्या हरभरा व तुरीच्या शेतात लावलेल्या गंजा अवकाळी पावसाने भिजल्या. आधिच जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास पळविला.
याशिवाय बहरलेल्या आंब्याचा मोहर गळून पडला आहे. यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या आंब्याच्या उत्पादनावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी वर्तविली आहे.
अकाली पावसामुळे वातावरणात बदल झाला असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. भंडारा जिल्ह्यात सरासरी ६६ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. यात भंडारा येथे १०० मि.मी., मोहाडी ८० तर साकोली येथे ७२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. हा पाऊस अतिवृष्टी असल्याने सर्वसामान्य नागरीकही यापासून वाचू शकला नाही.
भंडारा जिल्ह्यात या पावसाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. अन्य तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. कापणीला आलेले गहू या अतिवृष्टीच्या चक्रात अडकला आहे. यासोबतच चना व अन्य पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीचा फटका बसल्याने त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा या दृष्टीने महसूल प्रशासनाला सर्व्हेक्षणाचे आदेश दिले आहे. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिकांना जबर फटका बसला आहे. आधीच संकटात असलेल्या या शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)