पावसाने आले शेतकऱ्यांवर बुरे दिन; रबी पिकांची हानी
By Admin | Updated: March 8, 2015 00:26 IST2015-03-08T00:26:47+5:302015-03-08T00:26:47+5:30
अवकाळी पावसामुळे चौरास परिसरात मोठ्या प्रमाणावर रबी पिकांची हानी आलेली आहे. पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर ....

पावसाने आले शेतकऱ्यांवर बुरे दिन; रबी पिकांची हानी
आसगाव (चौ.) : अवकाळी पावसामुळे चौरास परिसरात मोठ्या प्रमाणावर रबी पिकांची हानी आलेली आहे. पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर शेती पीक मातीमोल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रविवारला आलेल्या पावसाएवढा जोराचा होता की शेतातील सारे काम बंद पडले आहेत. या पावसाने मूग, उडीद, गहू, चणा, तूर, जवस धनिया ही पिके पावसाने पूर्णपणे भिजलेली आहेत. त्यांना सुकविता आले नाही तर या मालाला बुरशी लागून काळे पडत असतात. अशावेळी हा माल विक्रीसाठी योग्य नसते. तर पिकांवर पाणी गेल्यानंतर गव्हाचा रंग उतरतो व तो पांढरा होत असतो. त्यामुळे हा गहू विक्रीस योग्य नसतो. कोणी घेतसुद्धा नाही. उभी पिके जमिनीवर लोळली असून पावसाने त्यांना लागलेल्या शेंगासुद्धा फुलल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यातील दाणे खराब होत आहेत. त्यामुळे या पावसाने शेतकऱ्यांचे बुरे दिन आले आहेत.
आंधळगाव : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे रबी पिकांचे मोठे नुकसान केले असून शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. आंधळगाव परिसरात पडलेल्या पावसाने गहू, हरभरा, लाखोरी, फळबाग यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात धानपिक लावले. धानाचे उत्पादन झाले. मात्र भाव कमी असल्याने ते साठवून ठेवले तर काही शेतकऱ्यांनी मातीमोल भावात व्यापाऱ्यांना विकले. घोरपड येथील १२ एकराचे शेतकरी बाळू गावंडे यांनी धान पिकानंतर रब्बी पिक लावले. या चना, गहू, लाखोरी हे पिक आठ एकरात पेरले.
मात्र आतापर्यंत सर्व काही ठीक असताना ऐन तोंडात पडलेले घास पुन्हा निसर्गाच्या लहरीपणामुळे नशिबातून गेले. शासनाने अगोदरच धानाचे भाव कमी केले व त्यावर भर घातलीया निसर्गाने. एकंदरीत झालेल्या पिकाचे लाखोचे नुकसान झाले आहे. शेतातील उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च जास्त आल्याने शेतकरी पुन्हा कर्जाच्या डोंगराखाली सापडला आहे.
टोला येथील शेतकरी राजू माटे यांनी शेतात टमाटर, मिरची, कोबी, आंबा, संत्रा आदींची फळबाग ५ एकरात आहे. याला खर्च एकरी २० हजार आला असून या अवकाळी पावसाने उत्पादनात घट झाल्याने कर्जाचे डोंगर वाढत असल्याचे बोलले.
कृषी विभागाने व शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी आंधळगाव परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहे. (वार्ताहर)