कर्मकांड टाळत संविधानाला वंदन करून गृहप्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 21:52 IST2019-01-19T21:51:53+5:302019-01-19T21:52:47+5:30
ना सत्यनारायणाची पूजा, ना कोणते कर्मकांड. जिजाऊ राजमाता, शिवधर्म गाथा, ग्रामगीता, तुकोबांचे अभंग आणि भारतीय संविधानाला त्रिवार वंदन करीत एका कुटुंबाने गृहप्रवेश केला. कर्मकांडाला फाटा देत उचललेले हे प्रेरणादायी पाऊल सध्या तुमसर शहरात सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. ही आगळीवेगळी गृहप्रवेशाची संकल्पना राबविली अनिल भुसारी आणि शीतल भुसारी या शिक्षक दांपत्याने.

कर्मकांड टाळत संविधानाला वंदन करून गृहप्रवेश
राहूल भुतांगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : ना सत्यनारायणाची पूजा, ना कोणते कर्मकांड. जिजाऊ राजमाता, शिवधर्म गाथा, ग्रामगीता, तुकोबांचे अभंग आणि भारतीय संविधानाला त्रिवार वंदन करीत एका कुटुंबाने गृहप्रवेश केला. कर्मकांडाला फाटा देत उचललेले हे प्रेरणादायी पाऊल सध्या तुमसर शहरात सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. ही आगळीवेगळी गृहप्रवेशाची संकल्पना राबविली अनिल भुसारी आणि शीतल भुसारी या शिक्षक दांपत्याने.
प्रत्येकाच्या मनात एक स्वप्नातील घर असते. घर बांधण्यासाठी आटापीटा केला जातो. आयुष्याची अर्धी अधिक पूंजी या घरावर खर्ची घातली जाते. वैज्ञानिक आधार घेत घराचे बांधकामही केले जाते. मात्र गृहप्रवेश आला की मग डोक्यात शिरतात ते कर्मकांड. सत्यनारायण, वास्तूशांती, होमहवन आदी धार्मीक उत्सव केले जातात. उच्चशिक्षिताने बांधलेल्या घरीही असे कर्मकांड होण्याचे प्रकार सर्वत्र दिसून येतात. परंतु या सर्व बाबीला एका पुरोगामी विचाराच्या शिक्षक दांपत्याने फाटा दिला. मन, मेंदू आणि मस्तक यांना गहाण न ठेवता त्यांनी पुरोगामी विचारातून आईबाबांच्या हस्ते फित कापून गृहप्रवेश केला.
भुसारी परिवार हा मोहाडी तालुक्यातील खैरलांजी येथील रहिवासी. तुमसर येथे नोकरीच्या निमित्ताने त्यांचा निवास. या ठिकाणी त्यांनी आपले घर बांधले. या घराच्या गृहप्रवेशासाठी त्यांनी निर्माण केलेला पायंडा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. याठिकाणी राजमाता जिजाऊ, शिवधर्म गाथा, ग्रामगीता, तुकोबाचे अभंग आणि भारतीय संविधानाला वंदन करून घरात प्रवेश केला. हा सोहळा अनुभवण्यासाठी तुमसरकरही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राहुल डोंगरे व चंद्रकांत लांजेवार यांनी शिवधर्म गाथेचे वाचन व तुकाराम महाराजांचे अभंग म्हटले. अभंगांचे अर्थही स्पष्ट केले. आनंददायी जीवन जगण्याचा संदेश केदार नाकाडे यांनी दिला. वैज्ञानिक दृष्टीकोन आणि पुरोगामी विचार स्वीकारणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.