...अन् सलून व्यावसायिकानं अंगावर पेट्रोल ओतून घेत केला आत्मदहनाचा प्रयत्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 12:40 IST2020-06-18T11:39:37+5:302020-06-18T12:40:02+5:30
भंडारा शहरातील काही व्यवसायीकांनी आपली दुकाने सुरु केली. त्यामुळे नगरपरिषदेच्या पथकाने कारवाई सुरु केली. पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगितले. काही कळायच्या आत व्यवसायिकाने सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले.

...अन् सलून व्यावसायिकानं अंगावर पेट्रोल ओतून घेत केला आत्मदहनाचा प्रयत्न!
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लॉकडाऊनमध्ये उघडे असलेल्या सलूनवर कारवाईसाठी गेलेल्या नगरपरिषदेच्या पथकासमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न सलून व्यवसायिकाने केल्याची घटना येथील राजीव गांधी चौकात बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी सलून व्यवसायीकाला वेळीच अटकाव केल्याने मोठा अनर्थ टळला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लॉकडाऊनमध्ये शासनाने सलून बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु शहरातील काही व्यवसायीकांनी आपली दुकाने सुरु केली. त्यामुळे नगरपरिषदेच्या पथकाने कारवाई सुरु केली. एक पथक बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास येथील राजीव गांधी चौकात गेले. त्याठिकाणी सलून दुकान सुरु होते. याबाबत विचारणा केली असता तेथील नोकरांनी मालक प्रमोद केसलकर (३५) रा.शुक्रवारी वॉर्ड यांना बोलावले. राजीवगांधी चौकात येताच पथकाने पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगितले. काही कळायच्या आत त्यांनी सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले. हा प्रकार पाहून नगरपरिषद पथकातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या सहकाºयांनी त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान या प्रकरणी नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी खुशाल कळंबे यांनी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
गत तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे दुकान बंद आहे. २० हजार रुपये दुकानाचे भाडे व कामगारांचा पगार देणे कठीण झाले आहे. त्यातच नगरपरिषदेने पाच हजार रुपये दंड आकारण्याचा इशारा दिला. त्यातून प्रमोद केसलकरने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.